नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
सौ. माधवी गाडगीळ | उत्तर प्रदेश
पायाभरणी पासून ते अगदी पूर्ण झालेली गगनचुंबी इमारत उभी राहीपर्यंत रामप्रकाश मिस्त्री तेथे काम करत होता. आज ह्या साईटवरचा त्याचा शेवटचा दिवस! उद्यापासून नवीन साईट. त्या सुंदर इमारतीच्या भिंतीलगत अतिशय विसंगत दिसणारे आपले झोपडीवजा घर मोडायचे, आणि झोपडीतील किडुक - मिडुक घेऊन उद्यापासून नव्या साईटवर नव्याने संसार उभारायचा. परंतु ह्या जीवनाची रामप्रकाशला जणूं सवय झाल्याप्रमाणें तो निर्विकार होता, स्थितप्रज्ञ होता. हेच आपले जगणें असेच तो समजून चालत होता. परंतु याचवेळी एक छोटूकला मात्र स्वप्नांत रमला होता. मिस्त्रीचा हात धरून नेहमी साईटवर जाणारा त्याचा १० वर्षांचा मुलगा अतुल, मात्र ती इमारत अगदी डोळेभरुन पहात होता. त्याच्या नजरेत कुतुहल होते, निराळीच चमक होती. तो त्याच तंद्रीत आपल्या वडिलांना म्हणाला, "मी पण एक दिवस मोठा इंजिनियर होणार". हे ऐकून रामप्रकाशने त्याचाकडे एक कौतुकाचा कटाक्ष टाकला, आणि बालसुलभ इच्छा आहे म्हणून तो गप्प बसला पण मग लगेच मान हलवत म्हणाला "छे, छे असं कधी होते का?"
जे साहेब खूप शिकून एव्हढ्या मोठ्या इमारतीचा आराखडा एका छोट्याशा निळ्या कागदावर बनवितात आणि त्याबरहुकूम एक सुंदर शिल्प आपल्यासारख्या मिस्त्री व मजुरांकडून उभें करुन घेतात, अशा साहेबांच्या जागी आपला मुलगा उभा राहू शकेल ही कल्पनासुद्धा तो अशिक्षित रामप्रकाश करु शकत नव्हता. अतुलचे ध्येय मात्र निश्चित होते आणि ते म्हणजे इंजिनियर होणें. इच्छा असेल तेथें मार्ग सापडतों असें म्हणतात तें खरे आहे. अशा अनेक एकलव्यांच्या ध्येयपूर्तीसाठी "एकलव्य शिक्षा प्रकल्प" ही संस्था पहाडासरखी उभी आहे. सेवाभारती संचलित ही संस्था उत्तर प्रदेशात मेरठ जवळील पल्लवपुरम येथें सुमारे आठ वर्षांपूर्वी गरीब विद्यार्थ्यांसाठी स्थापन झाली. संस्थेचे वैशष्ट्य म्हणजे येथे सर्व शिक्षण नि:शुल्क दिले जाते. बारावीमध्यें ९८% गुण मिळाल्यावर अतुलच्या वडिलांना जितका आनंद झाला त्यापेक्षा कित्येकपट जास्त आनंद आणि अभिमान अतुलच्या शिक्षणावर कित्येक वर्षें मेहेनत घेत असलेल्या संस्थेमधील शिक्षकांना वाटला.
उत्तर प्रदेशामधील मेरठ येथील पल्लवपुरम स्थित एकलव्य शिक्षण प्रकल्पात आर्थिक निम्नस्तरातील परंतु अतिशय मेहनती आणि शिक्षणाची आंस असलेलें हुशार विद्यार्थी गेली आठ वर्षें शिक्षण घेत आहेत. बारावी मध्यें गणितात ९८% गुण मिळवून एका नामांकित कॉलेजमधे सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेला अतुल, JEE परिक्षा देऊन नोएडा येथें नोकरी करणारी डॉली, मेरठच्या कॉलेजमधे B.Tech. करणारा इलेक्ट्रीशियनचा मुलगा सद्दाम ही संस्थेच्या यशाची कांहीं ठळक उदाहरणें.
प्रत्येक चांगल्या कार्यामागें एखाद्या सज्जन, सहृदयी व्यक्तीचे योगदान असावेच लगते. मेरठच्या एम. आय. ई. टी. कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री. दयारामजी हे यांपैकीच एक होत! जर ह्या गरीब आणि होत्करु होतकरू मुलांच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला नसता, तर या अवाढव्य जगात परिस्थितीची शिकार होऊन ही मुलें भरकटली असती. गरीब व हुशार मुलांना मदत करण्याच्या त्यांच्या उपजत स्वभावामुळें श्री दयारामजी सेवाभारतीच्या संपर्कात आलें, आणि सन २०१२ मधे त्यावेळी असलेलें प्रांतप्रमुख श्री अनिलजी व तत्कालीन संघचालकजी यांच्या सहकार्यानें त्यांनी ही संस्था स्थापन केली, व आपले 'दयाराम' हे नाव त्यांनी सार्थ केलें. श्री दयाराम हे आपले आवडतें ज्ञानदानाचे व प्रबंधनाचे कार्य करतात, तर इतर स्वयंसेवक व्यवस्थापनची आणि आर्थिक बाजू संभाळत आहेत. आज संस्थेमध्यें संगणक प्रयोगशाळा आहे, जेथें नोकरी व व्यवसायपुरक तसेच अकाउंटस मधील संगणकीय शिक्षण दिलें जातें. रोजच्या शैक्षणिक वर्गाखेरीच भौतिक शास्त्र व गणित ह्या विषयांमधील तज्ञ शिक्षक मुलांना निःशुल्क मार्गदर्शन देखील करतांत. याशिवाय पुढील व्यावसायिक भवितव्याच्या दृष्टीनें विद्यार्थ्यांचें समुपदेशन (काऊनसिलींग) करुन त्याप्रमाणें योग्य त्या शाखेचे शिक्षण त्यांना दिले जातें. त्यासाठी बाहेरुन त्यां त्यां विषयांतील तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले जातें. ही सेवा पूर्णत: मानद स्वरुपाची असतें. याची परिणीती म्हणजे आजमितीला संस्थेमधील शेकडों विद्यार्थी आपले शालेय शिक्षण पूर्ण करुन चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये शिकत आहेत.
चांगल्या कार्याच्या मागे नेहमीच पांडुरंग उभा असतो. संस्थेतील मुलांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश आणि त्यांचे उजळलेले भविष्य पाहून प्रेरित झालेले मेरठचे सुप्रसिद्ध डॉ. भरतकुमार ह्यांनी आपली स्वत:ची वास्तु संस्थेला अर्पित केली, आणि हीच सेवाधर्माची पावती होय! दयारामजी आजदेखील स्वतः मुलांना शिकवितात. दयारामजी सांगतात २०१२-१३ मध्यें १०९, २०१३-१४ मध्यें ११३ आणि त्यापुढील दोन वर्षांमध्यें १३६ व १६९ विद्यार्थी येथील शिक्षणक्रम पूर्ण करुन नामांकित महाविद्यालयांमध्यें उच्च शिक्षण घेत आहेत. संस्थेमध्येच शिक्षण पूर्ण करुन आज संस्थेमध्येच शिक्षिका म्हणून काम करणारी प्रिया सैनी तर म्हणते की, एकलव्य संस्थान हा एक शिक्षण प्रकल्प नसून ते एक कुटुंबच आहे, ज्याच्याशी येथील विद्यार्थ्यांचें नातें आयुष्यभरासाठी जोडलें जातें. शेवटी असे म्हणावेसे वाटते की, विद्यार्थ्यांच्या आशा - आकांक्षा पल्लवीत करणारे हे "पल्लवपुरम" आपले नांव खरोखरच सार्थ करते.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।