सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

महिला उद्योजकतेचे उदाहरण उद्योगवर्धिनी

महाराष्ट्र

parivartan-img

सुलोचना आजपर्यंत तो दिवस विसरलेला नाही जेव्हा गरोदरपणात गरम चपाती खाण्याच्या इच्छेमुळे  तिला नोकरीवरून काढूत टाकण्यात आले होते. गरिबीने जगणं मुश्किल केलं होतं, त्यावर बेकारीमुळे कामाच्या शोधात दारोदार भटकणे तिच्या नशिबी आलं होत. पण आज खूप काही बदललं आहे, सोलापूरच्या मेन मार्केटमध्ये पद्मा टॉकिजच्या बरोबर समोर गणेश मार्केटिंग नावाची तिची होलसेल एजन्सी आहे, आणि तिची वार्षिक उलाढाल लाखांमध्ये आहे. दुसरीकडे सामान्य गृहिणी असलेली अल्पना चंदनशिवे, जिने कधी काळी थोडा फार घरखर्च सांभाळण्यासाठी पापड बनविण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं, ती आता उगवती उद्योजिका आहे. अल्पना आज 500 पेक्षा जास्त महिलांना रोजगार देत आहे.




आता भेटूया वैष्णवीला, कधी पैशा-पैशासाठी संघर्ष करणाऱ्या वैष्णवीचं बूटिक आता फॅशनच्या नवीन डिझाईनसाठी ओळखलं जातं. दैनंदिन गरजांसाठी संघर्ष करणाऱ्या अशाच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्राच्या सोलापूर शहरात 2004 मध्ये उद्योगवर्धिनीची सुरूवात झाली. राष्ट्रीय सेवा भारतीच्या राष्ट्रीय विश्वस्त चंद्रिका चौहान यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या संस्थेने  600 बचत गटांच्या माध्यमातून दहा हजार महिलांना रोजगाराशी जोडले आहे.  संघाचे माजी प्रचारक असलेले शंभूसिंह चौहान यांच्या धर्मपत्नी असलेल्या  चंद्रिका चौहान आपल्या जीवनातील संघर्षातून जे काही शिकल्या, ते त्यांनी हजार पट करून समाजात वाटलं. महिला उद्यमतेच्या क्षेत्रात आदर्श बनलेल्या उद्योगवर्धिनीला उद्योजक प्रशिक्षणाबद्दल अनेकदा सर्वश्रेष्ठ संस्था म्हणून पुरस्कृत केलं गेलं आहे. 




ज्वारीची भाकरी आणि शेंगाच्या चटणीचं नाव घेताच मराठी माणसाच्या तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या या पदार्थांना उद्योगवर्धिनीने आज  इथे एक लोकप्रिय ब्रँड बनवले आहे. राज्याच्या या पारंपरिक भोजनाला आधार बनवून चंद्रिकाजींनी आठशे बेकऱ्यांना आपल्यासोबत जोडलं. इतकंच नाही तर  वृद्धाश्रम आणि रुग्णांच्या नातेवाईकांना केवळ दीड रुपयांमध्ये पौष्टिक भोजन खाऊ घातलं आहे. हा तर उद्योगवर्धिनीचा केवळ एक पैलू आहे.




संस्थेने शिलाई, कढाई, केटरिंग पॉटरी, डाळ-तांदूळ साफ करणे, घरगुती मसाले तयार करणे, जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करणे, उत्सवानिमित्त विशेष फराळ तयार कऱणे यांसारख्या वेगवेगळ्या व्यवसायांद्वारे महिला बचत गटांना एकत्र आणून त्यांना  आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले आहे. इतकंच नाही तर महिलांना घरी बसल्या बसल्या पैसे कमावण्याचे मार्गसुद्धा शिकवले आणि त्यांची मार्केटिंगसुद्धा करण्यात आली. आता वळूया सुलोचनाकडे. चंद्रिकाताईंकडे ती जेव्हा आली होती तेव्हा ती अनेक घरांमध्ये धुणी-भांडी करत असे. न्हावी समाजातील या महिलेला चंद्रिकाजींनी हेअर कटिंग सलूनमध्ये ब्लेड विकण्यासाठी प्रेरित केले. संस्थेच्या सतत मार्गदर्शन आणि सहकार्यातून हळूहळू सुलोचनाने सलूनसाठी आवश्यक असलेल्या सामानांच छोट दुकान सुरू केले. आज ते दुकान सोलापूरची सगळ्यात मोठी होलसेल एजन्सी बनले आहे. आता उद्योगवर्धिनीच्या मार्केटिंग टीमच्या प्रमुख असलेल्या सुलोचना यांनी नुकताच सलूनमध्ये लागणाऱ्या खुर्च्यांचा कारखाना सुरू केला आहे. 




अहमदाबादहून  सोलापूरला येऊन स्थायिक झालेल्या सामान्य गृहिणी असलेल्या चंद्रिका चौहान, पतीच्या ओपन हार्ट सर्जरीमुळे घराचे आर्थिक समीकरण बिघडले नसते, तर कदाचित कधी घराच्या उंबरठ्याबाहेर पडल्याही नसत्या. त्यावेळी टेलरिंग आणि कढाईतील सुवर्णपदक असलेली पदवी त्यांच्या कामी आली. शिलाई व कढाईच्या माध्यमातून त्या स्वतः स्वावलंबी झाल्या. संघाचे तत्कालीन प्रांत संघचालक डॉ. कुकडे यांच्या प्रेरणेतून चंद्रिकाजींनी आपल्या या प्रतिभेचा उपयोग अन्य महिलांना स्वावलंबी करण्यासाठी करायला सुरूवात केली. सोलापूरच्या धोत्रेकर वस्तीतील झोपडीत पहिल्या शिलाई केंद्रातून जी यात्रा सुरू झाली, त्यातून महिला उद्यमतेच्या प्रशिक्षणात एक सुवर्णाध्याय जोडला गेला. आज उद्योगवर्धिनीकडे स्वतःचे रोटी घर आहेत, त्यात दररोज पाच हजार चपात्या बनतात. त्या वेगवेगळ्या शाळा व इस्पितळांमध्ये जातात. त्यांच्या स्वयंपाकघरात दररोज अडीच ते तीन हजार जणांचे जेवण तयार होते. हे काम अनेक महिलांना घरबसल्या रोजगार पुरवत आहे. संस्था दर महिन्याला दोन क्विंटल शेंगांची चटणीसुद्धा विकते. दिवाळी व होळीसारख्या सणांच्या वेळेस इथे बनलेला विविध प्रकारचा फराळ परदेशातसुद्धा जातो. समाजाबाबतची संवेदनशीलता हाच संस्थेचा आधार आहे. इथे येणाऱ्या महिलांना प्रशिक्षणासोबतच भारतीय संस्कृती, देश आणि समाजाबाबत जबाबदारी सुद्धा शिकवली जाते. संस्था नेत्रहीन मुलांनी तयार केलेल्या पिशव्यांची मार्केटिंगसुद्धा करते. संघाच्या केंद्रीय सेवा गटाचे सदस्य आणि ज्येष्ठ प्रचारक श्री. उदय जोगळेकर म्हणतात, की उद्योगवर्धिनीचे यश पाहून राष्ट्रीय सेवा भारतीने महिलांच्या विकासासाठी चालू असलेल्या बचत गटांच्या वैभवश्री योजनेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. देशभरात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या या मोहिमेत  चंद्रिकाजी देशभरातील या मोहिमेत विविध प्रांतांतील महिलांना प्रशिक्षण देत आहेत.


संपर्क : चंद्रिका चौहान

मो. नं.-: 9422069455


835 Views
अगली कहानी