सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

प्रदीप पाटिल | तामिळनाडू

parivartan-img

अनावर झालेल्या अश्रूंना आज ती काही केल्या रोखू शकत नव्हती. सीता देवीच्या डोळ्यातुन पाझरणारे अश्रू हे खरं तर आनंदाश्रू होते. घरातल्या आर्थिक अडचणीमुळे २० वर्षांपूर्वी आपल्या वडिलांनी सावकाराकडे गहाण ठेवलेली जमीन सीताने आज आपल्या मेहनतीच्या पैशातून मुक्त केली होती. त्याचाच आनंद तिच्या डोळ्यांमधून पाझरत होता. आपली जमीन आपल्याला इतक्या वर्षांनंतर परत मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ६० हजार रुपयांच्या सावकारी कर्जाची परतफेड करून सीताने आपल्या परिवाराला कर्जमुक्त केले होते. अर्थात ही किमया घडली होती ती 'श्री मधुरम्मन' या स्वयंसहायता गटामुळे. 'कडापेरी' हे तामिळनाडूतील एक छोटंसं गाव. येथील काही भगिनींनी एकत्र येऊन' श्री मधुरम्मन' या बचत गटाची स्थापना केली आणि त्याच मधुरम्मनने आज सीतेला कर्जमुक्ती दिली होती. मधुरम्मन मधील भगिनींनी एकत्र येऊन सीताला मदत केली नसती तर कदाचित सीताचा परिवार 

अजूनही कर्जातुन मुक्त झाला नसता.





याबाबत बोलताना संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुंदर लक्ष्मणजी म्हणाले की,वीस वर्षांपूर्वी सेवाभारतीने तामिळनाडू राज्यातील वनवासी भागात वनवासी बांधवांच्या आर्थिक उन्नतीकरिता सुरू केलेल्या कामाचा परिणाम म्हणून संपूर्ण तामिळनाडू मध्ये 'श्री मधुरम्मन' सारख्या स्वयंसहायता गटांची संख्या आता ४ हजारांपर्यंत पोहचली आहे. हे स्वयंसहायता समूह (बचत गट) आर्थिक सक्षमीकरणा बरोबरच समाजाच्या मनात, एकमेकांबद्दल आपुलकी, स्नेहभाव ,संकटसमयी इतरांना मदत करण्याचा भाव जागृत करण्याचे कार्य करीत आहेत. अशाच प्रकारे स्वयंसहायता गटामुळे प्राण वाचलेल्या 'अनकचूकन्नराड' येथील राजू यांची कहाणीही यापेक्षा वेगळी नाही. राजुचा परिवार बचत गटाशी जोडलेला नसता, तर कदाचित हृदयाच्या आजाराने त्रस्त असलेले राजू आज जीवंत ही राहिले नसते. हृदय विकाराचा तीव्र झटका आलेल्या राजू, यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता डॉक्टरांनी बोलून दाखविल्यावर, त्याकरिता लागणारा पैसा राजू यांच्या कुटूंबाकडे नव्हता. त्यावेळी अनकचूकन्नराडमधील दहा बचत गटांनी एकत्र येऊन राजु यांच्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या मुलीकडे आर्थिक मदत उभी करून दिली, अणि म्हणूनच राजू यांच्यावर वेळीच उपचार होऊ शकले. अशाच पद्धतीने थाडीक्करन्नकोनमच्या एका विधवा आजीचे घर जळून खाक झाल्यानंतर, तेथील बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन त्या असहाय आजीला नवे पक्के घर बांधून दिले, व घरात लागणारी सामुग्री उपलब्ध करून दिली.


तामिळनाडू प्रमाणेच भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात स्वयंसहायता गटाची स्थापना करण्याच्या हेतूने सम्पूर्ण देशभर प्रवास करणारे सुंदर लक्ष्मणजी सांगतात की, तामिळनाडूमधीलच कन्या कुमारी जिल्ह्यात असणाऱ्या 'थिरूपरप्पू' गावातील महिलांनी जातपंचायतीच्या चुकीच्या प्रथा व परंपरा मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. जात पंचायतीशी टक्कर घेऊन स्पृश्य अस्पृश्यतेच्या गर्तेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचे महान कार्य हे बचत गट करीत आहेत. मागास प्रवर्गातील महिलेला बचत गटात प्रवेश नाकारण्याचा जात पंचायतीचा निर्णय धुडकावून त्या महिलेला सन्मानाने आपल्या गटाचे सदस्यत्व देऊन येथील महिलांनी सामाजिक समरसतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे.


वनवासी क्षेत्रात फोफावलेली खाजगी सावकारी व त्यातून वनवासी बांधवांचे होणारे आर्थिक शोषण आणि त्याचबरोबर जातीय भेदभाव या समस्यांच्या विरोधात आवाज उठविण्या बरोबरच दारुबंदी साठी मोर्चा काढण्यासही हे बचत गट आता हिंमतीने पुढे येत आहेत. आर्थिक उन्नतीबरोबरच सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यातही हे गट साह्यभूत ठरत आहेत. 'थाट्टीकेरे' गावात सुरू असलेला अवैध दारूचा गुत्ता बंद करण्यासाठी येथील महिलांनी निडरपणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार ठोठावले आणि तो दारुगुत्ता बंद केल्यानंतरच त्या शांत झाल्या. अशाच प्रकारे
'मुरुथनकोडे' गावातील महिलांनी एकत्र येऊन या गावात सुरू असलेला अवैध दारूचा कारखाना देखील बंद करून अन्य भगिनींसमोर वेगळा आदर्श निर्माण केला. अरिष्टनम या ठिकाणी आयुर्वेदिक औषधि निर्मितीच्या नावाखाली अवैध दारू तयार केली जात होती. येथे तयार होणारी नकली दारू पिऊन अनेकांना प्राणास मुकावे लागले होते. तो नकली दारू निर्मितीचा कारखाना बंद करण्याचे धाडसी काम येथील बचत गटाच्या महिलांनी केले. त्याकरिता त्यांना न्यायालयीन लढाईही लढावी लागली. अंतिमतः ती न्यायालयीन लढाई त्या महिला जिंकल्या आणि संबधित 

कारखान्याचा परवानाही रद्द करण्यात आला.

 

हे बचत गट एका बाजूला सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत असतानाच दुसऱ्या बाजूला मानवी संवेदनेतून पतित आणि पीडित बंधू भगिनींच्या उद्धाराचे कार्य करताना दिसत आहेत.या गटांच्या माध्यमाने सामाजिक सलोखा व आपआपसातील बंधूभाव जागृत करण्याचे महत्कार्य या गटाच्या निमित्ताने होताना दिसत आहे. तामिळ नाडू मधीलच 'नागरकोविलजवळच्या' 'भरतकली' या एका छोट्याशा गावातील शांती नावाच्या २३ वर्षीय विधवा भगिनीच्या पुनर्विवाहाची आर्थिक जबाबदारी येथील बचत गटातील भगिनींनी उदात्त पणे पार पाडली तर दुसरीकडे कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या दोन अनाथ मुली अनिता आणि कला यांच्या लग्नासाठी त्या गावातील बचत गटातील महिला सदस्यांनी सर्वतोपरी मदत केली. 


या कामातुन प्रेरणा घेऊन संघाचे स्वयंसेवक आता सम्पूर्ण देशभर 'वैभवश्री' या नावाने बचत गटांची निर्मिती करत आहेत. ज्याचा उद्देश स्वयंसहायता, स्वावलंबन, स्वाभिमान व परस्परांमधील विश्वास या सिद्धांताच्या आधारे वाटचाल करून सर्वांचे भले करणे, समाजातील आर्थिक दृष्टया दुर्बल, मागास व वंचित असलेल्या घटकांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मान हा भाव वाढीस 

लावणे हा आहे.

897 Views
अगली कहानी