नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
दिल्ली
खरोखरच दिल्लीतील कलंदर कॉलोनीतील मस्त कलंदरच होता तो बालक – शकील। दिवसभर फक्त धुमाकूळ, खोड्या आणि आवारागर्दीतच त्याचे मन रमत असे. घरातील वडिलधाऱ्यांनी हर तऱ्हेने प्रयत्न करूनही शिक्षण आणि शाळा त्याच्या खिजगणतीत नव्हत्या. गरीबीत जगणारे त्याचे कष्टकरी अब्बू-अम्मी आशा आशेवर जगत होते, की शकील शिकून-सवरून त्यांच्या म्हातारपणीचा आधार बनेल, परंतु आता त्याचे रंगढंग बघून त्यांना आपल्या अपेक्षांवर पाणी फिरताना दिसत होते. तितक्यात असे काही घडले , की त्यांच्या मावळत्या आशांना प्रकाशाची एक तिरीप दिसली. स्ट्रीट चिल्ड्रन प्रकल्पाशी संबंधित सेवा भारतीचे कार्यकर्ता त्यांच्या वस्तीत पोचले आणि त्यांची नजर शकीलवर पडली. ही टीम शकीलच्या घरी पोचली आणि त्याला संस्कारित करून प्रशिक्षित करण्याबाबत आपली योजना शकिल्च्या वडीलांना सांगितली , तेव्हा ते लगेच संमत झाले. मग काय शकीलने केंद्रात जाणे सुरू केले, आणि पाहता-पाहता तो वीज दुरुस्तीच्या कामात तरबेज झाला. संघाच्या स्वयंसेवकांच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्यात संस्कारांचे असे धुमारे फुटले, की आपण आपल्या अब्बू-अम्मीचे एवढे आज्ञाधारक कधी झालो, हे त्याचे त्यालाही कळाले नाही. आज वस्तीत शकील इलेक्ट्रीशियनच्या कामावर प्रत्येक जण फिदा आहे. तो चांगले पैसे कमावतो आणि त्यामुळे त्याचे आईवडील अत्यंत खुश आहेत.
सेवा भारतीतर्फे 1994 मध्ये भटक्या व उपेक्षित मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या स्ट्रीट चिल्ड्रन प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत शकीलसारख्या हजारो किशोरवयीन मुलांच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली आहे. आता जरा दिलशहा विहारवस्तीतील राजू दुबेलाच घ्या. हा किशोर स्वतःच या भागात चालणाऱ्या केंद्रावर जाऊ लागला आणि तिथे मन लावून संगणक प्रशिक्षण घेऊ लागला. आज हा उत्साही नवयुवक बी. कॉम. सेकंड ईयरच्या शिक्षणासोबतच प्रोजेक्टर कांट्रेक्टरचे काम करून व्यवस्थित पैसे कमावू लागला आहे. अशाच प्रकारे भटकं जीवन मागे टाकून संतोष आज केंद्रावर मिळालेल्या स्वालंबनाची प्रेरणा घेऊन भांड्यांच्या फेरीच्या व्यवसायातून चांगले पैसे कमावू लागला आहे. आपल्या पत्नीनेही या प्रकल्पात काम करावे, अशी त्याची इच्छा आहे.
सेवा भावनेच्या विचाराने अंकुरित झालेला हा प्रकल्प आज स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांनी पल्लवित होऊन एक विशाल वटवृक्ष बनला आहे. याच्या छायेत हजारो किशोर जीवन सुसंस्कारांच्या सुगंधाने न्हाऊन निघत आहेत. सुरूवातीला अडचणी आल्या, पण मुलांमध्ये आश्चर्यकारक बदल पाहून अनेक कुटुंबे येऊन मिळाली. आज हजारांपेक्षा अधिक मुलांनी या प्रकल्पात प्रशिक्षण घेतले आहे. सेवा भारती दिल्लीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानप्रकाशजी म्हणतात, की जोपर्यंत भटक्या व उपेक्षित मुलांना शिक्षण दिले जात नाही तोपर्यंत देशाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होऊ शकणार नाही.
सेवा भारतीचे हे सेवाकार्य दिल्लीतील वस्त्यांमधील अरूंद गल्ल्यांमधील किती तरी आवारा किशोर बेकारी, आळशिपणा आणि गुन्हेगारीच्या अंधकारात नाहीसे होण्यापूर्वी त्यांच्या जीवनात स्वावलंबनाची नवी ऊर्जा भरत आहे. प्रशिक्षणासोबत मिळणारे संस्कार त्यांना उत्तम माणूस अणि नागरिक तर बनवतातच, समाजालासुद्धा या किशोरांच्या रस्ता चुकून
गुन्हेगार होण्याच्या चिंतेपासून मुक्त करतात.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।