नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
प्रदीप पाटिल | गुजराथ
जिच्या घराचे बजेट आर्थिक अडचणींमुळे नेहमी कोलमडलेले असायचे, आज तीच दीपिका सीए बनून सरकारी बजेटचे ऑडिट करत आहे. अर्थातच एका सामान्य कुटुंबातील दीपिका ते एक सीए बनलेली दीपिका, हा तिचा जीवनप्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता. मजुरीचे काम करून करून आजारपणामुळे थकलेले वडील, व घरातून बाहेर पडू न शकणारी आई, यामुळे घरात पैशांची कायम विवंचना. अशाही परिस्थितीत स्वतःच्या शिक्षणात खंड न पडू देणारी ही दीपिका इतर विद्यार्थ्यांसाठी खरोखरच एक प्रेरणा बनली. घरात आर्थिक हातभार लागावा याकरिता स्वत:चे शिक्षण करता करता आपल्या एका छोट्याशा खोलीच्या घरात शिकवण्या घेत असताना स्वतःच्या अभ्यासाकडे वेळ देणं तसं कठीणच, परंतु शिकुन खुप मोठं व्हावं, हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दीपिकाने शिकवण्या घेत असतानाच, स्वतःचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही चालू ठेवला. त्याकरिता तिला मदत झाली ती नरोडा (गुजरात) येथील महिला स्वावलंबन केंद्राद्वारे सुरू असलेल्या ग्रंथालयाची. जे केंद्र दीपिका सारख्या अनेक मुलींना मागील २७ वर्षांपासून शिक्षणासाठी मदत करत आहे.
१९९३ साली आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महिला स्वावलंबन केंद्राची सुरुवात किरण बाधेला, मधुबन प्रजापती, हेतल बेन यांनि काही संघ कार्यकर्त्यांच्या मदतीने केलि होती. स्टीचिंग क्लासेस पासून सुरू झालेले हे केंद्र आज दीपिकासारख्या अनेक महिला व मुलींचे आधार केंद्र बनले आहे. हे केंद्र मागील २७ सत्तावीस वर्षांपासून शेकडो भगिनींना शिलाई, कढाई ,बॅग मेकिंग सारख्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यास मदत करीत आहे. मागील सहा वर्षांपासून या केंद्रात मायक्रोसॉफ्ट ऑफिस, टॅली यासारखे रोजगारपूरक अभ्यासक्रमही शिकवले जात आहेत, ज्यामुळे सेवा वस्त्यांमधील शेकडो मुलींना कम्पन्यांमध्ये नौकरी मिळाली आहे. अहमदाबाद शहराच्या बाहेरील सौजपुरबोधा नरोदा परिसरात सुरू असलेल्या या स्वावलंबन केंद्रामुळे आज अनेक महिला आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनल्या आहेत.
गुजरात मध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम करणाऱ्या कामगारांची स्थिती फार दयनीय आहे. छोट्या छोट्या घरांमध्ये वास्तव्य करून दररोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या समाजातील मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती तर फारच कठीण आहे. येथील अनेक मुली पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे एक तर आपले शिक्षण अर्धवट सोडून देतात, किंवा अनेक मुलीचे शिक्षण जबरदस्तीने बंद केले जाते. याचप्रमाणे हातगाडीवर दुकान चालविणारे छोटे व्यवसायिक, बांधकाम मजूर, या समाजाची परिस्थितीही कमीजास्त प्रमाणात अशीच आहे. येथील मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी हे केद्र सातत्याने प्रयत्न करीत आहे. कॉम्पुटर केंद्रात प्रशिक्षण देणाऱ्या श्रीमती कृती जैन यांच्या म्हणण्यानुसार, या स्वावलंबन केंद्रात महिलांना केवळ आर्थिक बाबतीतच स्वावलंबी केले जात नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता केंद्रात विविध उपक्रम राबविले जातात. विविध विषयातील तज्ञांच्या मार्फत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. वादविवाद स्पर्धा, गीत गायन, रांगोळी काढणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. मकर संक्राती, रक्षाबंधन, समरसता दिवस या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमधून महीलांमध्ये सामाजिक भाव, देश प्रेमाची जागृती निर्माण करण्याचे कार्य केले जाते. या केंद्राच्या कामाशी सुरुवातीपासून जोडलेल्या किरणजी सांगतात की, महिलांच्या आरोग्याच्या बाबतीतही केंद्र लक्ष देते. त्याकरिता टीबी, ब्रेस्ट कॅन्सर या सारख्या आजारांच्या तपासणी साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. याशिवाय कमी खर्चात योग्य व पोषक आहार कसा घेता येईल, याबाबत आहार तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. तसेच वॉटर बेड, व्हील चेअर यासारखे रुग्ण उपयोगी साहित्य मोफत अथवा अत्यल्प खर्चात उपलब्ध करून दिले जाते.
आज हे असे स्वावलंबन केंद्र, जे महिलांनी, महिलांसाठी सुरू केलेले, अणि महिलांद्वारे चालविलेले, महिलांच्या विकासाचा आदर्श नमुना म्हणून पुढे आले आहे. या केंद्रांचे सर्व व्यवस्थापन संघ परिवारातील भगिनी पाहत आहेत. सुनीती बेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली १२ महिलांची समिती या केंद्राचे संचलन अतीशय उत्तम रीतीने करीत आहेत. केंद्राचे आर्थिक नियोजनही समितीच्या महिला सदस्य उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत. एका छोट्याशा खोलीत सुरू झालेले केंद्राचे कार्य आता तीन मजली अशा भव्य इमारतीत सुरू आहे. या वाढलेल्या कामाचे श्रेय सुनितिजी आवर्जून, सेवा इंटर नॅशनल व सेवाभारतीला देतात, कारण त्यांच्यामुळेच केंद्राची तीन मजली वास्तू आज उभी राहू शकली आहे. आज दीपिका सारख्या शेकडो मुली स्वतःचे शिक्षण उत्तम पद्धतीने पूर्ण करून आपल्या वैयक्तिक जीवनातील काही वेळ या केंद्रासाठी देतात , आणि स्वतःप्रमाणेच इतर मुलींच्या शिक्षणाकरिता प्रयत्न करतात .
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।