नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
अरुण सरस्वते | हिमाचल प्रदेश
पर्वतीय भागात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना हिमवृष्टी ही आनंदाची पर्वणी असते. अशा आकर्षक परिसरापासून दूर उजाड पर्वतीय भागात राहणाऱ्या ग्रामीण भागासाठी, हिमवृष्टी हे एक असे संकट आहे की जे त्यांना इतर भागातील सुविधा आणि संसाधनापासून वंचित करते. हिमाचल प्रदेशच्या पांगी आणि व्यारा या दोन गावांची व्यथा अशी आहे. वर्षातील नऊ महिने हिमवृष्टीमुळे या गावांचा इतर भागाशी संपर्क तुटलेला असतो. चंबा जिल्ह्यापासून पांगी वीस मैल दूर आहे, तर व्यारा सिमल्यापासून 50 कोस दूर आहे. येथे कुणीही पर्यटक येत नाहीत, ना प्रशासनाला त्याची फिकीर असते.
जोरदार हिमवृष्टी असलेल्या या भागात शिक्षण, आरोग्य चिकित्सा, रोजगार या आवश्यक गरजा, जणू काही बर्फाच्या पाषाणाखाली गोठून गेल्या आहेत. येथील पांगी गावचा बजीरूराम व व्यारा गावाचा आदर्श या दोन तरुणांशिवाय याची जाणीव कुणाला असेल? या दोघांनी कधीही शाळेचा चेहरा पाहिला नाही. हिमाचल सेवाभारती द्वारा 2012 मध्ये विवेकानंद छात्रावासच्या स्थापनेनंतर, शाळा आणि शिक्षणाची आवश्यकता व गरज त्यांना कळाली. यापूर्वी त्यांच्या जीवनात निराशा व नाउमेदीच्या अंधाराशिवाय कोणताच प्रकाश नव्हता. छात्रावास सुरू झाल्यावर दोघांच्या आशा पल्लवीत झाल्या. उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ मिळाले. बजीरूरामने इंटरमध्ये 90 टक्के मार्क मिळविले. आज हे दोघेही पदवीला आहेत. जवळच लुधवाडा या गावाची रिम्पी आणि तिची धाकटी बहीण यांच्या आई वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे त्या अनाथ झाल्या होत्या. याची माहिती सेवाभारतीचे नगराध्यक्ष विनोदजी अग्रवाल आणि अशोकजी यांना कळाली. तेव्हा त्यांनी महत्प्रयासानंतर सेवाभारतीतर्फे त्यांना दत्तक घेतले. आता या दोघी सुशिक्षित होऊन आपल्या पायावर उभ्या आहेत. निरोगी माणसाला अपंग करून टाकणाऱ्या फिजिकल डिस्ट्रॉफी या आजाराने ग्रस्त असलेल्या या भागातील पवना आणि तिच्या चार मुलांची दयनीय अवस्था पाहून, सेवाभारतीचे कार्यकर्ते डॉक्टर तिलकराज व जोगिंदरसिंग राणा यांनी तिला डॉक्टर राजेंद्रप्रसाद हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले व तिच्यावर उपचार केले.
येथून जवळ असलेल्या कांगडा विभागात 1998मध्ये झालेल्या बस दुर्घटनेमध्ये वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी होती. या घटनेने कांगडा भागातील सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांना विचार करण्यास प्रेरित केले. सेवाभारतीचे तत्कालीन अध्यक्ष रामसुख गुप्ताजी यांच्या प्रयत्नांनी 2005च्या सुरुवातीला दोन अॅम्बुलन्स विकत घेण्यात आल्या. या अॅम्ब्युलन्स ऑक्सिजन सिलिंडरपासून सर्व उपचार सुविधांनी सज्ज आहेत. जर आपण कधी मेडिकल कॉलेजला गेलात, तर "मे आय हेल्प यू" या बॅनरखाली सेवाभारतीचे कार्यकर्ते तुमची सर्व प्रकारची मदत करण्यासाठी हजर असलेले दिसतील. येथील रुग्णांना रोज सकाळी दोन ब्रेड व एक कप चहा दिला जातो. रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत गादी व पांघरुणाची सोय केली आहे. गरजू रुग्णांसाठी व्हीलचेअर व कुबड्याही आहेत. या पर्वतीय विभागात सेवाभारतीची मानवीय संवेदना, सेवावृत्ती व सेवा समर्पणाचे मूल्यमापन करायचे असेल तर, क्रोएशिया पर्यटक "जोरीका काहा" यांचे उदाहरण आहे. त्या हिमालय दर्शनाला या ठिकाणी आल्या होत्या व धर्मशाला येथे अचानक आजारी पडल्या. सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रयत्नांची शर्थ केली. पण, त्यांना ते वाचवू शकले नाहीत. त्यांचा पूर्ण सन्मानाने विधिवत अंतिम संस्कार करून त्यांचा अस्थिकलश क्रोएशिया दूतावास अधिकाऱ्यांना सोपविला.
सेवाभारतीने व्यापक स्तरावर या दुर्गम पर्वतीय विभागात, संस्कार केंद्र आणि शिलाई केंद्राची स्थापना करून शिक्षण व रोजगार क्षेत्राला चालना दिली आहे. येथील गोठलेल्या पहाडी जीवनाच्या परिस्थितीला शरण न जाता त्याच्याशी सामना त्यांनी केला आहे. सेवाकर्मींचा सेवासंकल्प आणि येथील नागरिकांचे जीवनसुद्धा अन्य विभागांबरोबर समन्वयाने काम करण्यास आता सज्ज झाले आहे.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।