नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
जयश्री कटीकर | दिल्ली
जेव्हा मातीत माती मिसळते, त्या मातीचे काय मोल?
मृत्यूनंतरही जीवन देणारी, माती आहे अनमोल!!
घराबाहेर उभी असलेली शववाहिनी आणि अंगणात मृत पतीचा मृतदेह! वर्षांपूर्वी केलेला संकल्प पूर्ण करण्याची ती आता वाट बघत होती. दुसरीकडे, आपली आई करत असलेल्या विद्रोहाच्या विरोधात असमंजस मुलांचा आवाज टिपेला पोचला होता – “‘माती’बरोबर आम्ही उलट-सुलट काही होऊ देणार नाही, ही पद्धत चुकीची आहे, आम्ही अंतिमसंस्कार पूर्ण करणारच.” तेव्हा पत्नीच्या मनातल्या थरथरत्या भावनांनी मौन तोडले. फक्त एक वाक्य आणि सर्वांची तोंडे बंद झाली. "देहदानाचा संकल्प माझ्या पतीचा आहे, आणि यामध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही." ‘दधीची देहदान समिती’च्या वतीने आपलं काम करायला गेलेले समितीचे संयुक्त सरचिटणीस (महासचिव) डॉ. विशाल चढ्ढा सांगतात ‘अशा अत्यंत भावनिक-नाजुक क्षणांमध्ये आपल्या पतीसोबत केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पत्नी आपल्याच मुलांविरुद्ध उभी राहिली. ही साधारण भावना नसून आध्यात्मिक आहे. अशा अनेक आठवणी या ‘दधीची देहदान समिती’शी निगडित आहेत. ही सत्यघटना आहे श्री संपूर्ण-जीत- कौर आणि त्यांचे दिवंगत डॉक्टर पती यांची.
देहदानाचा संकल्प म्हणजे आयुष्य संपल्यानंतरही जगण्याचा जगावेगळा प्रवास आहे. शिवाय ज्यांनी हा संकल्प केला आहे, ते स्वतः या प्रवासात सहभागी आहेत. या पवित्र कार्याला औपचारिक स्वरूप देण्यासाठी, महर्षी दधीची यांच्याकडून प्रेरणा घेऊन या ‘दधीची देहदान/अवयव दान समिती’ची स्थापना 11 ऑक्टोबर 1997 रोजी करण्यात आली, ज्याचे पहिले देहदान-संकल्पपत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रसिद्ध प्रचारक स्वर्गीय नानाजी देशमुख यांनी भरले होते. दिल्ली एन. सी. आर., बुलंदशहराबरोबरच जवळजवळ 9 जिल्ह्यांमध्ये ही समिती कार्यरत आहे. सुमारे 300 कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचेच हे फळ आहे की, गेल्या 13 वर्षांत सुमारे 1300 लोकांचे वेगवेगळे अवयव मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या शरीरात जिवंत आहेत. यामध्ये 375 जणांचे संपूर्ण देहदान तर 925 हून अधिक डोळे दान करण्यात आले आहेत. 18000 हून अधिक संकल्पपत्रे (फॉर्म) भरण्याचे काम समितीच्या स्वयंसेवकांनी केले आहे. एवढेच नव्हे तर ‘दधीची देहदान समिती’च्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशभरात इतर ४६ समित्या या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करायला लागल्या असून ‘दधीची देहदान समिती’चे संस्थापक, संरक्षक व विश्व हिंदू परिषदेचे विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. श्री आलोकजी स्वत: त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
शेवटी हा देहदानाचा विचार आला कुठून??? या प्रश्नाचे उत्तर देताना श्री आलोकजी म्हणतात, “एकदा अमृतसरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर डॉ.
हुकम सिंग विर्क (माजी विभागप्रमुख - शरीरशास्त्र) यांचा हाडांचा सापळा पाहिला, तेव्हा "आयुष्यभर मी माझ्या मुलांना इतरांचा देह वापरून
शिकवले आहे, आणि मला वाटतं की माझ्या मृत्यूनंतर माझा देह
वापरून माझ्या महाविद्यालयातील मुलांनी त्यांचे शिक्षण चालू ठेवावे", हे त्यांचं म्हणणं कळलं. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि अॅलोपॅथिक या सर्वच वैद्यक क्षेत्रात जिथे एक
देह वापरून 4 ते 5 विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, तिथे 40 ते 50
विद्यार्थ्यांना त्यावर अभ्यास करावा लागतो.”
आलोकजी सांगतात की त्याच वेळी डोक्यात विचारचक्र सुरू झाले. 1995 मध्ये त्यांनी त्यांच्या 7 मित्रांसह आपली देहदानाची इच्छा रीतसर नोंदवली. आणि 1997 मध्ये ‘दधीची देहदान समिती’ स्थापन केली. समितीच्या उपाध्यक्षा सौ. मंजू प्रभा सांगतात, “सुरुवातीला देहदान करवून घेताना अनेक अडचणी आल्या. कधी गाडी नाही, कधी ड्रायव्हर नाही, कधी कुटुंबाला समजवायला खूप वेळ लागला, कधी कुठल्या कॉलेजचा फोन लागलाच नाही तर कधी उचलला गेला नाही, तर कधी मृतदेह ठेवायला कॉलेजमध्ये आवश्यक टब नाही. सुमारे तीन-चार वर्षांच्या सतत परिश्रमानंतर आता परिस्थिती अशी आहे की, दिल्लीच्या कोणत्याही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 24×7 सुरळीतपणे देहदानाची व्यवस्था सुरू झाली आहे. एन. सी. आर. मध्ये सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयांच्या मृतदेहाची मागणीही आता पूर्ण होत आहे.”
देहदानाचा संकल्प एकीकडे तुमची आध्यात्मिक जाणीव
जागृत करतो. तुम्ही म्हणजे हे शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात
आणि हे शरीर म्हणजे या जगाच्या प्रवासाचे केवळ एक साधन आहे, हे सांगतो. तर दुसरीकडे
या संकल्पातून शरीर निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठीही
प्रेरणा मिळते. कारण केवळ उत्तम देहातील अवयवच लोककल्याणासाठी उपयुक्त ठरतात.
अंतिम टप्प्यात अखेरचे श्वास मोजणाऱ्या माणसाच्या निस्तेज, हरलेल्या आणि थकलेल्या देहाला आपली निर्जीव मातीही कुणाच्या तरी
आयुष्यात नवी आशा, नवा प्रकाश आणणार आहे, कुणाला तरी नवे जीवन भरभरून देणार आहे, या विश्वासापेक्षा अधिक समाधान कोणते असेल?
संपर्क :– डा. विशाल चड्ढा
मो.नं.: – +91- 98183 45704
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।