नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
प्रसाद पत्की | महाराष्ट्र
“कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर पूर्ण अवलंबून असल्यामुळे होत नव्हता. शहराकडे नोकरी शोधण्यासाठी स्थलांतर करणे आवश्यक होते,” महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या बाबतीतील हे एक कटुसत्य होते. 5035 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या आणि जवळपास 67 टक्के लोकसंख्या अनुसूचित वर्गातील असलेल्या या जिल्ह्यात भूक आणि गरिबी या मोठ्या समस्या होत्या. मात्र, डॉ. हेडगेवार समितीने येथील शेकडो शेतकऱ्यांना 27 वर्षांपूर्वी आशेचा किरण दाखवला. समितीने सुरू केलेल्या कार्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन हळूहळू विकासाच्या मार्गावर येत आहे.
आज, येथील शेतकरी वेगळे विश्व अनुभवत आहेत. भूक, गरिबी, कुपोषण हे आता इतिहासजमा झाले आहे. डॉ. गजानन डांगे, श्री. ललित बाळकृष्ण पाठक, श्री. रंगनाथ रुंजाजी नवले आणि इतर स्वयंसेवकांनी 27 वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार समितीची स्थापना केली. समितीच्या अथक प्रयत्नांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडले. महाराष्ट्रातील नवापूर तहसीलमधील खांडपारा भागातील आठ गावांत समितीने सुरुवातीला काम करण्यास सुरुवात केली. नवापूर एके काळी अत्यंत मागास म्हणून गणले जायचे. पण, नाबार्डच्या साह्याने सेवा समितीने हे चित्र बदलून टाकले. या प्रकल्पांतर्गत पाचशे शेतकऱ्यांनी आंबा आणि आवळ्याची झाडे लावली.
राष्ट्रीय नवोन्मेष परिषदेकडून शेतकऱ्यांना “फार्म बंडिंग”चे प्रशिक्षण दिले गेले. यामुळे जमिनीची धूप थांबली. शेताच्या उतारावर शेवटच्या ठिकाणी विहीर बांधून जलसंधारण वाढले. एकमेकांच्या विहिरीतून पाण्याचे आदानप्रदान करण्यास शिकवले. समितीने या विभागातील दहावीपर्यंतच्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी शाळा उभारल्या. सध्या सुमार पाचशे विद्यार्थी या शाळांतून शिक्षण घेत आहेत.
या भागात नेसू नदी आहे. समितीचे सचिव नितीन यांनी सांगितले, की “दर वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नदीकिनारी प्रार्थना करण्यासाठी शेकडो लोक येतात. पाणी समस्या सोडवण्यासाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा समितीने शेतकऱ्यांना स्वतःच छोटे बंधारे बांधण्याची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांनी नेसू नदीवर छोटे बंधारे बांधले आणि त्यांच्या शेताला पाणी पुरवले. सरकारनेही आता 17 पक्के बंधारे बांधले आहेत.” समितीने शेतकऱ्यांच्या अगदी छोट्या समस्येकडेही लक्ष दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता मिटल्या. शेतकऱ्यांना उफणणीसाठी गुजरातला जावे लागे. त्यामुळे वेळ जाण्याबरोबरच पैसा आणि श्रमही त्यासाठी अधिक लागे. ही समस्या सोडविण्यासाठी समितीने तेरा गावांत तेरा कारखाने सुरू केले आणि उफणणीसाठी लागणारा पैसा शेतकऱ्यांना त्यांच्या सवडीनुसार देण्यास सांगितले.
मजुरी करणाऱ्यांना त्यांच्या घराच्या परसदारात भाजीपाल्याच्या शेतीचे प्रशिक्षण दिले. केवळ एकाच पिकामुळे जमिनीचा दर्जा कमी होतो. त्यामुळे गुंठ्यांमध्ये विविध प्रकारची पिके लावली गेली आणि त्यासाठी पिकांचे कॅलेंडर तयार केले गेले. टेटीबाई कुशल पावरा यांना उत्तम प्रकारच्या भाजीपाला विक्रीसाठी “एनआयसीआरए”कडून पुरस्कार मिळाला आहे. कृषी विज्ञान केंद्रामध्ये समितीच्या साह्याने त्यांना प्रशिक्षण मिळाले होते.
पश्चिम क्षेत्राचे क्षेत्र सेवाप्रमुख उपेंद्र कुलकर्णी म्हणाले, “शेतकऱ्यांचे स्थलांतर आणि त्यांच्या होणाऱ्या आत्महत्या यांच्याविरोधात समितीचा हा लढा आहे. या लढ्याला या बारा गावांमध्ये विकासाच्या रूपात बऱ्यापैकी यश आले आहे.”
संपर्क – डॉ. नितीन पंचभाई
8888085005
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।