नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
प्रसाद पत्की | मध्यप्रदेश
कुणीतरी म्हटले आहे, की, "चांगला शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करतो, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि त्यांच्या कल्पकतेला वाव देतो." भोपाळ येथील श्रीमती निर्मला सगदेव वनवासी छात्रावास येथे असेच काही सुविचार लिहून ठेवले आहेत. संघ प्रचारक आणि सेवाभारतीचे अध्वर्यू स्व. विष्णुकुमारजी यांनी हा प्रकल्प १९९६ मध्ये पुढाकार घेऊन सुरू केला. येथे कोरकू, भिल्ल, गोंड अशा लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करून एक यशस्वी आणि स्वावलंबी जीवन जगण्याची संधी दिली जाते. येथे शिकून पुढे गेलेले विद्यार्थी आयुष्यात यशस्वी मार्गक्रमण करीत आहेत. त्यांपैकी १९ जण अभियंते, ५ शिक्षक तर १ डॉक्टर आहे. कृष्णाला अभ्यासात विशेष रुची नसे. गणित आणि इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही विषयात त्याने कधी फारसा रस दाखवला नाही. मध्य प्रदेश येथील बालाघाट परिसर येथे MPEBमध्ये तो अभियंता म्हणून कार्यरत आहे. अशीच काहीशी कहाणी गोवर्धन प्रसाद नावाच्या एका मुलाची आहे. जो एका दुर्लक्षित कुटुंबातील आहे. झारखंड जिल्ह्यातील विष्णूपूर नावाच्या एका लहान खेड्यात त्याचा जन्म झाला होता. सध्या तो भोपाळमध्ये रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहे.
कृष्णा आठव्या तर गोवर्धन सातव्या इयत्तेत होते, जेव्हा त्यांना प्रथम येथे आणण्यात आले. येथे असलेले प्रेमळ निवास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि अभ्यासातील सातत्य या गोष्टींमुळे तयार झालेल्या पोषक वातावरणामुळे त्यांनी १२वीत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. येथे विद्यार्थी सकाळी लवकर उठून प्रार्थना म्हणतात आणि योगासने करतात; न्याहारी आणि जेवण वेळच्या वेळी करतात. येथे अभ्यासाबरोबरच खेळही नियमितपणे खेळले जातात. महिन्यातून दोनदा स्वच्छता मोहीम राबविली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी, दिवाळी, गुरुपौर्णिमा यांसारखे सण सेवाभारतीतील सर्व विद्यार्थी मिळून एक कुटुंब म्हणून साजरे करतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण व प्रतिभांचा शोध घेऊन त्यांचे सादरीकरण करण्यासाठी वार्षिक कार्यक्रम/स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. गेली १० वर्षे अनुजकांत उदेनिया हे या विद्यार्थ्यांचा सांभाळ करीत आहेत. थोरल्या भावाप्रमाणे किंवा गरज पडेल तेव्हा कडक पालकाच्या रूपाने ते या ५२ विद्यार्थ्यांची
जबाबदारीने काळजी घेत आहेत. ते म्हणतात, की विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गरजेवेळी सेवाभारती त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहील.
संस्थेच्या अध्यक्षा वर्षाजी आणि इतर महिला सहकारी जसेकी अनिताजी, प्रतिभाजी, आशाजी या संस्थेतील विद्यार्थीही त्यांची पाल्ये असल्याप्रमाणे त्यांच्या गरजा भागवतात. संस्था संचालक श्री. बी. एस. खंडेलवाल आणि श्री. विवेक मुंजे यांच्या मार्गदर्शनाचादेखील विद्यार्थ्यांना लाभ होतो. अरुणजी आणि सपना शेट्टी आणि त्यांच्यासारखे बरेचसे लोक हे कोणताही आर्थिक मोबदला न घेता या विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकासामध्ये आपले योगदान देत आहेत. इमारतीची स्वच्छता व नीटनेटकेपणा, आरोग्यदायी अन्न आणि इतर सर्व गरजा येथे भागवल्या जातात. सेवाभारतीच्या या प्रयत्नांनी प्रेरित होऊन स्व. जे. पी. सगदेव, जे एक सरकारी अधिकारी होते, यांनी स्वतःचे दुमजली घर आपली पत्नी निर्मला सगदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ संस्थेस देणगी म्हणून दिले. येथे येणारे विद्यार्थी हे अशा जमातीतून आलेले आहेत जेथे शिक्षण आणि यश यांचे किरणही अद्याप पोहोचलेले नाहीत. दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव आणि व्यसनाधीनता यांमुळे या जमाती मागासलेल्या राहिल्या आहेत. येथे शिकलेले विद्यार्थी आपापल्या खेड्याचा कायापालट करण्यासाठी झटत आहेत. गेली १५ वर्षे प्रांतिक समितीचे मुख्य असलेले आणि संघाचे विद्यमान प्रांत प्रमुख सोमकांत उमाळकरजी सांगतात, की येथे शिक्षण पूर्ण करून गेलेले विद्यार्थी हे आपल्या कुटुंबाला तसेच संपूर्ण गावाला व्यसनाधीनतेपासून मुक्त करण्यात यशस्वी होत आहेत.
संपर्क: अनुजकांतजी
संपर्क क्र.:९७१३०८५८६५
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।