सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

जगावेळी हिम्मत शाळा

प्रदीप पाटिल | महाराष्ट्र

parivartan-img

      आठवी वर्गात शिकणारी तेरा-चौदा वर्षांची किशोर वयातील मुलं म्हणजे आता कुठे त्यांच्या जीवनात शिक्षणाची खरी सुरुवात झालेली असते. याच वयातील चार मुलं आपलाच वर्गमित्र असलेल्या मोनुला किरकोळ भांडणातून शाळेच्या मधल्या सुट्टीत जबरदस्तीने जवळच्या शेतात नेवून तुटलेल्या बिअरच्या बॉटलने त्याच्यावर वार करतात. यात मोनू गंभीर जखमी होतो .मात्र पोटात काच घुसूनही सुदैवाने तो घटनेतून बरा होतो. परंतु १० सप्टेबर २०१२ रोजी घडलेल्या या आकस्मिक घटनेमुळे त्या घटनेत सहभागी झालेल्या चार बालकांचे शिक्षणाचे दरवाजे मात्र कायमचे बंद होतात. ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या पिरंगुट येथील एका खाजगी शाळेतील.

या घटनेत सहभागी असलेल्या त्या चार विद्यार्थ्यांना शाळा काढून टाकते. पोलीस कारवाईमुळे पुढे त्या मुलांची रवानगी बालसुधार गृहात होते.काही काळ बाल सुधार गृहात राहून जेंव्हा ही मुले घरी परततात तेंव्हा समाज त्यांच्या कपाळावर नापास व गुन्हेगारीचा शिक्का मारतो . त्यांच्या परिचयातील प्रत्येकजण या मुलांकडे एक गुन्हेगार म्हणून पाहू लागतो. लोकांकडून होणारी निंदा आणि उपेक्षेमुळे ही मुले कदाचित पुन्हा त्या गुन्हेगारीच्या दलदलीत फसली गेली असती, परंतु, हिम्मत शाळेने वेळीच त्या मुलांच्या हाताला धरून पुन्हा त्यांना शिक्षणाच्या योग्य मार्गावर आणल्याने ही मुले त्या अंधकारमय भविष्यापासून वाचली.



 


अशा प्रकारे विविध कारणांनी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर चाललेल्या शेकडो मुलांना पुन्हा प्रवाहात आणण्याचे काम करणारी ही जगावेगळी हिम्मत शाळाराष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेने, पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुक्यात अंबडवेट नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात सुरु केली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने गुन्हेगारीकडे वळलेल्या, व्यसनांच्या आहारी गेलेल्या तसेच समाजाकडून उपेक्षित असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना हिम्मत शाळेत प्रवेश देवून त्यांना दहावी परीक्षेत उत्तीर्ण केले जाते. काही मुले तर दहा-बारा वर्षांच्या दीर्घ अंतराने या शाळेच्या माध्यमाने पुन्हा प्रवेश घेवून दहावीचा अभ्यास क्रम पूर्ण करतात. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख श्री अनिलजी व्यास आणि त्यावेळी संस्थेत कार्यरत असलेले श्री नितीनजी घोडके यांच्या प्रयत्नातून १५ जुलै २०१२ मध्ये ८ विद्यार्थ्यांना प्रवेश देवून या जगावेगळ्या हिम्मत शाळेचीसुरुवात झाली. या शाळेत फक्त दहावीचाच वर्ग भरवला जातो. आता देशभरात या शाळेची माहिती झाल्याने विविध राज्यातील मुले या शाळेत प्रवेश घेतात. येथील शाळेत मुलांना शालेय अभ्यासाबरोबर मोबाईल रिपेअरिंग, शेती, दुग्ध व्यवसाय, इलेक्ट्रीकल, शेती अवजारांची निगा व दुरुस्ती या सारखे व्यवसाय प्रशिक्षणही दिले जाते. याच शाळेत दहावीचे शिक्षण पूर्ण करून हिंजवडी येथील आयटी नगरीत आता हॉटेलांना चपातीचा पुरवठा करण्याचा सन्मानाने व्यवसाय करणारा मनीष आठवले (परिवर्तित नाव), तोच विद्यार्थी आहे, ज्याने बिअरच्या बॉटलने मोनुवर सर्वात जास्त वार केले होते. पुण्यातील प्रतिष्ठीत कुटुंबातील एकुलता एक असलेल्या आणि एकेकाळी खोडकर असणाऱ्या सुशीलबद्दल सह्याद्री शाळेच्या मुख्याध्यापकांना आता कसलीही तक्रार नाही. काही वर्षांपूर्वी याच सुशीलने शाळेच्या सहलीदरम्यान रागात येवून सिगारेटच्या लायटरने पूर्ण बसच पेटवून दिली होती. आज हाच युवक नाशिक येथे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करीत आहे.



 

या शाळेच्या स्थापनेपासून मुलांना मराठी भाषेचे अध्यापन करणारे शिक्षक प्रदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार , मुलांमध्ये हे आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे श्रेय येथील राष्ट्र्भावनेने प्रेरित होऊन दिले जाणारे शिक्षण आणि संस्कारयुक्त दिनचर्येला जाते. याबद्दल माहिती देताना प्रदीप पाटील म्हणतात कि, येथील मुलांना केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण दिले जात नाही, तर मुलांचे मन, मनगट आणि मेंदू बळकट होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक उपक्रमही राबविले जातात, ज्यामध्ये नियमित व्यायाम,योगासन,प्राणायाम याबरोबरच प्रत्यक्ष शेती कामाचाही अनुभव दिला जातो. हे सत्य आहे कि, औद्योगिक प्रगती जीवनात प्रगतीचे दरवाजे उघडते , परंतु त्याचबरोबर कधी कधी हीच औद्योगिक प्रगती समाजाच्या अध:पतनालाही कारण ठरू शकते. 






पुणे शहरापासून अवघ्या ३० ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळशी तालुक्यात ओद्योगीकरणाला सुरुवात झाली आणि येथील जमिनींचे भाव गगनाला भिडले. आपली जमीन विकून हातात वारेमाप पैसे आलेले काही लोक ना स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले ना आपल्या मुलांवर .त्याचा परिणाम शेवटी जो व्हायचा तोच झाला. ज्या वयात मुलांच्या हातात वही ,पेन व पुस्तक असायला हवे होते, त्याच किशोर वयीन मुलांच्या हाती दारूच्या बॉटल आणि इतरांना धाक दाखविण्यासाठी शस्त्रे दिसू लागली. ही मुले शिक्षणापासून दूर जावून चुकीच्या मार्गाला लागली. २०११ -२०१२ मध्ये ही परिस्थिती इतकी बिघडली कि, बाल गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे जिल्ह्यात मुळशी तालुका क्रमांक एकवर जावून पोह्चला, तर दुसरीकडे मुलांना आठवीपर्यंत नापास करायचे नाही या शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार शाळा मुलांना नापास करू शकत नव्हती. अभ्यासात मागे राहिलेली मुले पुढे दहावीत नापास होऊन शाळेचे नाव खराब करणार या भीतीने, शाळावाले या मुलांना नववीत नापास करू लागले. एका अर्थाने ही मुले शाळा आणि पालकांसाठी एक समस्या बनली होती. शाळांनी नापास केलेल्या या मुलांना पुन्हा एकदा शिकण्याची संधी देण्याचे काम हिम्मत शाळेने सुरू केले. याबाबत अधिक माहिती देताना हिम्मत शाळा प्रमुख योगेश कोळवनकर म्हणतात की, ८ वी पर्यंतचे शिक्षण कसंबसं पूर्ण करून नववीत नापास झालेल्या या मुलांना साधं लिहिता -वाचता देखील येत नाही. आठ -दहा वर्षाच्या दीर्घ विश्रांतीनंतर दहावीत प्रवेश घेतलेले काही विद्यार्थी तर दहावीची परीक्षा दोन- तीन वर्षाच्या प्रयत्नाने पास होतात. संतोष नावाच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण देताना ते सांगतात की, ड्रग्ज सारख्या औषधांच्या आहारी गेलेला २१ वर्ष वयाचा संतोष तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर कसाबसा ४ विषयात पास झाला. पण या कालावधीत त्याच्या सवयी सोडविण्यात मात्र आम्हाला यश आले . त्याच्यात कमालीची सुधारणा होऊन तो आता स्वतःच्या गावी शेती व्यवसाय करत कुटुंबियांसोबत आनंदाने राहतो आहे.

मागील आठ वर्षात १६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असेच आमूलाग्र बदल घडवून 'हिम्मत शाळा' आता जगभरातील एक अनोखी शाळा म्हणून ओळखली जावू लागली आहे.

710 Views
अगली कहानी