सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आनंद धाम-आपल्या माणसांचे घरकुल

मध्यप्रदेश

parivartan-img

हसतमुख प्रसन्न चेहरे आणि अनुभवाने परिपूर्ण असे तजेलदार डोळे हीच येथे राहणाऱ्या लोकांची ओळख होय. येथे राहणाऱ्या लोकांचा उत्साह आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बघून ही माणसे आपल्या कुटुंबियांपासून वर्षानुवर्षे दूर रहात आहेत याची कल्पनासुद्धा येत नाही. ही गोष्ट आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे असलेल्या "आनंदधाम वरिष्ठ जनसेवा केंद्राची". मध्य भारतातील सेवाभारती मार्फत चालविल्या जाणाऱ्या ह्या केंद्रामधे ज्येष्ठ नागरीक अतिशय आनंदाने एखाद्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे राहतात.




सेवाभारतीचे तात्कालीन पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि समाजातील विविध गरजा व समस्या त्यांनी वेळीच ध्यानात घेतल्यामुळे ह्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. तुलसीदास रचित रामायण मुखोद्गत असलेले आणि त्याचाच ध्यास घेतलेले श्रीयुत राजेंद्र प्रसाद गुप्ता गेली पंधरा वर्षे कौटुंबिक अडचणी व समस्यांमुळे येथेच रहात आहेत. बरकतुल्ला विश्वविद्यालयामधून डेप्युटी डायरेक्टर पदावरुन सेवानिवृत्त झालेले गुप्ताजी केंद्राच्या विविध कार्यक्रमांमध्ये स्वतः केलेल्या कविता ऐकवुन सर्वांचे मनोरंजन करीत असतात. आजुबाजूच्या परिसरातील गरीब व गरजू मुलामुलींसाठी केंद्रामधे सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तिन्ही वेळी चालविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण वर्गाचा लाभ १५० पेक्षा अधिक मुलेमुली घेत आहेत.




समितीचे पदाधिकारी श्रीयुत रविंद्र सुरंगे सांगतात की ह्या केंद्राची स्थापना १८ डिसेम्बर २००५ रोजी करण्यात आली. सध्या केंद्रामध्ये पंधरा महिला आणि तेरा पुरुष वास्तव्यास आहेत. ह्याखेरीज संस्थेतर्फे परिसरात योगवर्ग, फिजियो थेरेपी केंद्र, न्यूरो थेरेपी केंद्र व प्रतियोगी परीक्षांसाठी प्रशिक्षण वर्गासह एक विधिक परामर्श केन्द्रदेखील निःशुल्क चालविले जाते. येथे दररोज येणारे होमिओपॅथी डॉक्टर येथे राहणाऱ्या सभासदांखेरीज समाजातील इतर रुग्णांवर देखील उपचार करतात. इथल्या OPD मधे दरमहा साधारणपणे 500 हुन अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. सकाळी सुरु होणाऱ्या योगवर्गापासून ते संध्याकाळी होणाऱ्या पूजाविधिपर्यन्त येथील लोकांसाठी एक व्यवस्थित दिनचर्या आखलेली आहे. संध्याकाळी चार ते सहा ह्या दरम्यान येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यावेळी बाहेर राहणारे कित्येक सेवाभावी लोक येथील सभासदांबरोबर वेळ घालवितात. काहीजण तर आपल्या मुलांचे वाढदिवस आणि काही जोडपी आपल्या लग्नाचा वाढदिवस येथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांबरोबर साजरे करतात.

केंद्रामधे महिला व पुरुष ह्यांची राहण्याची सोय वेगवेगळी असून त्यांच्यासाठी तपासणी कक्ष, चिंतन केंद्र, सांस्कृतिक विभाग, मंदीर, उद्यान, जलपान केंद्र यासह एका वाचनालयाचीही व्यवस्थित सोय करण्यात आली आहे. आपात्कालीन वैद्यकीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रामधे चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध असते. सेवानिवृत्त शिक्षिका गायत्रीजी असो की स्वर्गीय प्रथमश्रेणी अधिकारी मेहरोत्राजींची पत्नी प्रेमा मेहरोत्रा असो अथवा प्रभा शाह ज्यांना सर्वजण प्रेमाने बंगाली अम्मा म्हणतात त्या असोत, ह्या प्रत्येकीचे केंद्रामधे महत्वाचे योगदान आहे. गायत्रिजींनी आयुष्यभर आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या पण त्यांनी लग्न केले नाही. इटारसी मधील आपले घर दान केल्यावर एकटेपणाचा कंटाळा येण्या आधीच त्यांनी स्वतःला केंद्राच्या कामात झोकून दिले.

रोजच्या आरतीनंतर सगळ्यांना अंगारा लावुन प्रसाद वाटणाऱ्या नंदकिशोर शर्माजींचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सतत दिसत असतो. आपले सुटकेसचे दुकान बंद केल्यावर मुलगी व जावई ह्यांच्याबरोबर राहण्या ऐवजी शर्माजींनी आनंदधाम संस्थेलाच आपले घर व येथील सभासदांना आपले कुटुंब मानले. ही सर्व मंडळी आनंदधामशी इतकी एकरूप झाली आहेत की जेंव्हा येथे पती पत्नी जोडप्यांना एकत्र राहण्यासाठी वेगळे निवास बांधण्याचे काम चालु होते तेंव्हा प्रेमाजींनी आपल्या निवृत्ती वेतनामधून एक लाख रुपये संस्थेला देणगी म्हणून दिले. प्रेमाजी म्हणतात येथे आम्हाला कुठलेही शुल्क न आकारता सर्व सुविधा पुरविल्या जातात. इतकेच नव्हे तर प्रेम आणि आपुलकीने चोवीस तास आमची वास्तपुस्तही केली जाते. अशी काळजी तर घरात देखील घेतली जात नाही.




ह्या केंद्राशी अगदी पहिल्यापासून सम्बंधित असलेले आणि पूर्वी, मध्य क्षेत्र सेवा प्रमुख असलेले गोरेलालजी सांगतात की येथे आम्ही फक्त साठ वर्षांवरील लोकांनाच प्रवेश देतो. दाखला देतानाच त्या व्यक्तीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची आम्ही इत्यंभूत माहिती घेतो. त्यांच्याशी चर्चा करुन, त्यांना समजावुन त्यांनी आपल्या कुटुंबात परत जावे असे प्रयत्न करण्याकडे आमचा प्रथम कल असतो. केंद्रात प्रवेश मिळाल्यानंतर कुटुंबातील माणसांना संस्थेने निर्धारित केलेल्या वेळेमधेच भेटता येते. सेवाभारतीला वाहून घेतलेले श्रीयुत कैलाश कुशवाहजी सांगतात की येथील कार्यकारी समितीच्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर येथे बराच काळ राहिलेले कित्येक सभासद आपापल्या घरी परत देखील गेले आहेत. स्वर्गीय मुक्ता सेहेगल अम्मा यांची आठवण येऊन अतिशय जड अंतःकरणाने कैलाशजी सांगतात की जेंव्हा अम्माजींच आपल असं कोणीच नव्हतं आणि पडल्यामुळे घरात देखील त्यांना चालता फिरता येत नव्हतं तेंव्हा सेवाभारतीने त्यांना आसरा देऊन शेवटपर्यंत त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांची सेवा केली. मरण येण्यापूर्वीच मुक्ताजींनी अरोरा कॉलनीमधील आपले घर गरीब मुलींचा छात्रावास करण्यासाठी सेवाभारती संस्थेला दान केले. मुक्ताजींप्रमाणेच येथे राहणाऱ्या प्रत्येक सभासदाचा मरणोत्तर अंतिम संस्कार कुटुंबीय करतील त्याचप्रमाणे यथाविधी केला जातो. येथे राहणारा प्रत्येकजण आनंद धामलाच आपले घर मानतो आणि तशीच अनुभूती घेत जगतो. सेवाभारतीचे क्षेत्र संगठन मंत्री रामेंद्रजी सांगतात की गेली पंधरा वर्षे हा प्रकल्प कोणत्याही सरकारी अनुदान अथवा मदतीशिवाय केवळ समाजातील अनेकजणांच्या सहकार्याने व मदतीने कार्यरत राहिला आहे.

 संपर्क :- श्री रविंद्र सुरंगे

 मो.नंबर :- 9425116748

 

1144 Views
अगली कहानी