सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

ज्ञानाचा त्रिवेणी संगम

माधुरी आफळे | मणिनगर | गुजराथ

parivartan-img

आईबरोबर चहाच्या दुकानात काम करत असताना मनीषा च्या डोक्यात नेहमी आपण कधीतरी दहावीतरी पास होऊ का? हा विचार यायचा. गणित आणि विज्ञानात सुरुवातीपासूनच ती कच्ची होती. रिक्षा चालवणारे अशिक्षित वडील दारूच्या व्यसनात इतके बुडले होते, की ते स्वतःच कधी शुद्धीवर नसायचे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?. गुजरातच्या मणिनगर शहरात कांकरिया रामानंद कोट, या झोपडपट्टीत राहणारी ही मुलगी, आज मात्र  बारावी चांगल्या मार्काने पास होऊन, लग्न करून फॅशन डिझायनर चे काम करते आहे, आणि ते चहाचं दुकान ? ते आता तिचे व्यसनमुक्त वडील सांभाळत आहेत. चेतन रावळचीही कहाणी अशीच. लग्नात ढोल वाजवून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या, मनसुख रावळ यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे चेतन. याला अभ्यासात खूप गोडी होती, परंतु वडिलांची अर्धी कमाई दारूत जायची, त्यामुळे शाळेची फी भरणंही फार कठीण जायचं. परंतु आज मात्र मणीनगर मध्ये प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर चेतन रावळ भूतकाळाकडे मागे वळून सुद्धा बघत नाहीत. मिल्लत नगर येथे झोपडीत राहणारा सलीम, जेव्हा सतत तीन दिवस शाळेत आला नाही, तेव्हा शिक्षिक त्याला बघण्यासाठी त्याच्या घरी गेले. टायफाईड ने आजारी असलेल्या या मुलाचा सगळा  औषधोपचाराचा खर्च शिक्षकांनी केला. आज मणीनगर मध्ये एका मिलमध्ये नोकरी करून पूर्ण कुटुंब चालवणारा हा मुस्लिम युवक खुदा नंतर फक्त संघस्वयंसेवक आणि त्याचे शिक्षक कनुभाई यांच्यासमोरच नतमस्तक होतो .


या तीनही मुलांच्या  आयुष्याला सुखद वळण देण्यासाठी कारणीभूत ठरले आहे ते गुरुजी ज्ञान मंदिर .

मणीनगर मधील सरकारी शाळेत संध्याकाळी 5 ते 8 चालणारे हे विद्यादान  केंद्र. अज्ञानाच्या व परिस्थितीच्या  अंधकारात चाचपडणाऱ्या गरीब आणि वंचित मुलांच्या जीवनात शिक्षण, संस्कार आणि आत्मनिर्भरता आणणारे हे केंद्र, म्हणजे त्यांच्या आयुष्यात उगवत्या सूर्याचा एक किरण. शाखा सेवा कार्यकर्ते कनुभाई राठोड, आणि सध्या विभाग सेवा प्रमुख असलेले मधुभाई बारोट यांच्या प्रयत्नांनी, 14 वर्षांपूर्वी हे विद्यादान केंद्र सुरू झालं. या  केंद्रात मुलांना शिकण्यासाठी फी लागत नाही, पण त्याच बरोबर येथील शिक्षक ही सेवाव्रतीच आहेत. या विद्यादान केंद्राशी सेवाभावाने जोडलेले सर्व हितचिंतक गरजेनुसार कधीकधी आर्थिक भारही उचलतात.


14 वर्षांपूर्वी जेव्हा कनुभाई एका शाखेचे सेवा कार्यकर्ते होते, तेंव्हा एक उपक्रम म्हणून सेवा वस्तीत जाऊन मुलांना मॉडेल मॅक्झिन नावाचं एक गणित आणि विज्ञानाचे पुस्तक वाटप करायचे, परंतु ते पुस्तक तिथली मुलं समजू शकत नव्हती असे त्यांच्या लक्षात आले. त्या भागातल्या सरकारी शाळेची गुणवत्ता बघता दहावी पास होणे सुध्दा या मुलांना कठीण होते. मग या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी 2009 मध्ये एका संघ स्वयंसेवकांच्या घरी एका छोट्या खोलीत सात मुलांना घेऊन श्री गुरुजी ज्ञान मंदिर या नावाचे विद्यादान केंद्र सुरु झाले. शिक्षणाबरोबरच मुलांना संस्कार ही दिले जात होते. अनेक वर्षांपासून इथे शिकवत असणारे, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षक श्री जयेश ठक्कर म्हणतात," या ठिकाणी आम्ही मुलांना अनेक उपक्रमांना जोडत असतो. गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन ,जन्माष्टमी, नवरात्र हे सण आपल्या पद्धती नुसार  मुलांबरोबर साजरे केले जातात. वेळोवेळी इथे सांस्कृतिक विषयांवर निबंध, चर्चासत्र, देशभक्ती गीतगायन, कथाकथन अशा अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळां बरोबरच विधानसभा बघणे, रुग्णालयात जाऊन फळ वाटप करणे , रुग्णांना राखी बांधणे अशा उपक्रमातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला जातो. दहावी-बारावी नंतर या मुलांसाठी भविष्यात कोणत्या विषयांची निवड कशी करायची या संबंधी मार्गदर्शन सत्रही आयोजित केली जातात. मुलांच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पालक-शिक्षक मिळावे घेतले जातात, तर काही शिक्षक नियमितपणे वस्तीत जाऊन गृहभेटी ही करतात."


सुरुवातीला  या विद्यादान केंद्रात फक्त दहावीच्या मुलांना शिकवले जायचे, परंतु काळानुसार आता नववी ते बारावी पर्यंत सर्व वर्ग सुरू झाले आहेत. मणीनगर येथील सरकारी शाळेत भरणाऱ्या श्रीगुरुजी ज्ञानमंदिरात शंभराहून जास्त मुलं शिकतात, जी खोखरा, घोडासर वटवा ,बेहरामपुरा अशा ठिकाणाहून येतात. काही मुले तर फक्त शिकण्यासाठी दहा किलोमीटर सायकल चालवत येतात.

खरं तर शिक्षण, संस्कार आणि  भविष्याची निवड कशी करायची याचे मार्गदर्शन यांचा त्रिवेणी संगम, म्हणजेच गुरुजी ज्ञान मंदिर असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

संपर्क :–कनुभाई गुरूजी मंदिर

मो.नं. : –91-98794 71330

888 Views
अगली कहानी