सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

शिक्षणातून ग्रामविकासाची वाट सापडलेलं आसरवा

प्रदीप पाटिल | गुजराथ

parivartan-img

कुठल्याही गावाचे दिवस कसे बदलतात याची अनुभूती घ्यायची असेल तर एकदा नक्कीच  आसरवा गावाला भेट द्यायला हवी. 'आसरवा' हे गुजरात मध्ये समुद्र किनाऱ्यावर वसलेलं मच्छिमार बांधवांच एक छोटसं गाव. गावाची लोकसंख्या जेमतेम एक हजार. मच्छीमारी व शेती हे या गावाचे प्रमुख पारंपरिक व्यवसाय. एकेकाळी शिक्षणाच्या दृष्टीने मागास असलेले आसरवा गाव आता शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासाच्या प्रवाहात आले आहे. अर्थात ही किमया घडवून आणली  आहे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अंबालाल गोहील यांनी. अंबालालजी यांचा गावाला जणू काही परीस स्पर्श झाला आणि गावाचे स्वरूपच बदलून गेले. कदाचित अंबालालजी इथे आले नसते तर आता जे काही बदलेले आसरवा आहे ते पहायलाच मिळाले नसते. शैक्षणिक बाबतीत गावात कमालीची उदासीनता  असल्याने  येथील मुले-मुली  इयत्ता सातवी ते आठवी पर्यंत शिक्षण कसंबसं पूर्ण करू शकत असत. क्वचितच एखादा विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी जात असे. त्यामुळे बहुतांशी मुलं शिक्षणापासून दूर जायची. पालकांची उदासिनता व आर्थिक परिस्थितीमुळे ही मुलं पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हती.

 २००४ साली आसरवा गावाशी संपर्क आलेल्या अंबालाल गोहील यांच्या लक्षात ही बाब आल्यावर याबाबत आपण काहीतरी करायला हवं या विचाराने त्यांनी त्या ठिकाणी मुलांच्या पुढील शिक्षणाची सोय करण्याचे ठरविले.  ठरले खरे, पण त्यासाठी लागणारा आर्थिक खर्च उभारणार कसा हा प्रश्न होताच. अंबालाल आणि त्यांच्या सहकारी स्वयंसेवकांनी याकरिता एक नामी युक्ती काढली. जवळच्या ठिकाणी असलेल्या बँक ऑफ बडोदा या बँकेच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांची बचत बँक सुरू केली. बालपणीपासूनच शालेय विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय लावून ते पैसे त्यांच्या छोट्या मोठया शैक्षणिक अडचणीत  शिक्षणासाठी उपयोगी पडू लागले. विद्यार्थ्यांना आता त्यांच्या पुढील खर्चासाठी उसनवारी किंवा खाजगी सावकाराच्या कर्जातून नव्हे तर स्वतःच्या बचतीच्या पैशातून शिक्षण घेता येऊ लागले. यामुळे  अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची अडचण दूर झाली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या अन्य गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी हा एक नवा मार्ग आसरवा गावाने  दाखवून दिला आहे.  आसरवा ग्रामस्थांच्या एक एक रुपयांच्या बचतीतून बँक ऑफ बडोदाच्या जम्मूसर शाखेत आसरवा ग्रामस्थांच्या बचत खात्यात आता 3 लाख रुपये जमा झाले आहेत.

 

याबाबत अतिशय अभिमानाने माहिती देताना आय आयटी कानपुर मध्ये शिक्षण घेत असलेले आसरवा गावचे युवा विद्यार्थी कल्पेश रतनचंद्र म्हणाले की, मागील दोन वर्षांपर्यंत गावात हायस्कुल नव्हते . त्यामुळे ८ वी पासून पुढील शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना गावापासून ३० की. मी दूर असलेल्या जम्मूसर येथील शाळेत जावे लागत असे. त्याअगोदर अनेक विद्यार्थ्यांकडे येजा करण्यासाठी अथवा होस्टेल मध्ये राहून शिकण्यासाठी पैसाही नसे.  त्यामुळे आता बँकेतील बचतीतील पैशातून माझ्यासारखे सुमारे ६० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले आहेत. 

गावातील हायस्कुल मध्ये सहशिक्षक म्हणून काम करणारे दिव्येशजी म्हणाले की, ग्रामस्थानी आता स्वतःच्या खर्चाने दोन नवीन वर्गखोल्या बांधल्या आहेत. त्यामुळे गावात हायस्कुल सुरू झाले आहे. हे हायस्कुल केवळ शाळाच नाही तर ते ग्रामविकासाचे केंद्र बनू पाहत आहे.याच शाळेच्या माध्यमाने गावासाठी झोला वाचनालय सुरू करण्यात आले . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमाने गावातील घराघरापर्यंत पुस्तक पोहचू लागले आहे. गावातील प्रत्येक घराची भिंत सुविचाराने रंगली आहे.काही स्वयंसेवकांच्या प्रयत्नातून गावात गायत्री परिवाराचे काम सुरू झाल्याने गावात नशा मुक्ती अभियान सुरू झाले.त्याचा परिणाम म्हणून अनेकजण नशा मुक्त झाल्याने त्यांचे परिवार आनंदी झाले आहेत.

 

आसरवा आता केवळ शिक्षणाच्या बाबतीतच अग्रेसर झाले नाही तर ग्रामविकास विषयात काम करणाऱ्या अंबालालजी सारख्या अनेक संघ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून गावात ग्रामविकासाचे विविध प्रयोगही सुरू झाले आहेत. मिठाच्या पाण्यामुळे क्षारपाड व नापीक झालेल्या जमिनीत देशी गायीच्या शेण व गोमूत्राचा वापर केल्याने येथील हजारो एकर जमीनीवर  हिरवी गार पिक डोलताहेत आणि घराघरात आवळा आणि हिरड्याच्या उत्पन्नाने समृद्धी आणली आहे.हे पाहून आपलं मन  रंगून जातं.

शिक्षणाच्या सोयीसाठी विद्यालयाच्या स्थापनेच्या पावला पासून सुरू झालेला व आसरवा गावाला एक नवी दिशा देणारा  हा प्रवास आता सम्पूर्ण ग्रामविकासापर्यंत कधी येऊन पोहचला हे कोणाला कळलेच नाही ! ..

1155 Views
अगली कहानी