सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आदर्श गाव बघुवार-मध्य प्रदेश

मध्यप्रदेश

parivartan-img

भारताचे खरे दर्शन गावांमध्येच होते. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील बघुवार गाव असेच एक आदर्श गाव. प्रत्येकाने पाहावे, असे हे बघुवार गाव. स्वच्छ रस्ते, बंद ड्रेनेज, घराघरांत शौचालय, खेळण्यासाठी इनडोअर मैदान, स्वयंपाकासाठी बायोगॅसचा वापर अशा विविध सुविधांनी गाव सज्ज आहे. पोलिसांच्या नोंदीमध्ये गेल्या कित्येक वर्षांत गावातील एकाही तंट्याची नोंद नाही. शाळा आणि सामूहिक भवन उभारण्यासाठी सरकारने दिलेल्या निधीमध्ये ग्रामस्थांनी भर टाकली आणि श्रमदानही केले.




गेल्या 50 वर्षांपासून या ठिकाणी सुरू असलेली संघाची शाखा आणि स्वयंसेवकांद्वारे ग्रामविकासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. गावामध्ये गेल्या 25 वर्षांपासून ठाकूर सुरेंद्र सिंह, ठाकूर संग्राम सिंह, हरिशंकरलाल सरपंच राहिले आहेत. तत्कालीन सरकार्यवाह भाऊराव देवरस यांच्यापासून प्रेरणा घेऊन यांनी गावाला आदर्श बनविण्याचे ठरविले. गावामध्ये 50 वर्षांपासून नियमितपणे सुरू असलेली प्रभातफेरी असो, किंवा दारावर लिहिलेले सुविचार किंवा पावसाचे पाणी साठविण्याची असलेली यंत्रणा; बघुवार गाव इतरांपासून वेगळे आहे.




बघुवार ग्रामविकास समिती 1950पासून संपूर्ण गावाच्या विकासाच्या मॉडेलवर काम करीत आहे. गावापर्यंत येणारा तीन किलोमीटरपर्यंतचा रस्ता येथील युवकांनी बनवला आहे. बघुवार गावातील शेतीतज्ज्ञ व संघाचे तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक एम. पी. नरोलिया सांगतात, गावातील लोक विकासासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहात नाहीत. सरकारकडून मिळालेल्या निधीमध्ये गावकऱ्यांनी दीड लाख रुपयांची भर टाकून गावातील स्कूलभवनचे काम पूर्ण केले. भ्रमरी नदीवर बांधलेल्या स्टॉपडॅमच्या कामामध्ये आणखी अडीच लाख रुपयांची भर टाकून गावाला भेडसावत असलेल्या पाण्याचे दुर्भिक्ष्यही दूर केले. नियमित स्वच्छता, घरांसमोरील शोषखड्डे, अंडरग्राउंड ड्रेनेजची निर्मिती, गावात वृक्षारोपण, पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचा सिंचनासाठी वापर गावकऱ्यांनी करून गावाला आदर्श बनवले आहे.




गावातील शंभर टक्के लोक साक्षर आहेत. या ठिकाणी घरांच्या दरवाजांवर सुबोध, संस्कारक्षम, लोकांच्या मनाला भावणारे सुविचार लिहिलेले आहेत. एवढेच नव्हे, तर गावांतील 40 टक्के लोकांच्या घरातील स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा वापर होतो. येथील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक नियमितपणे उपस्थित राहावेत, मुलांचा अभ्यास चांगला राहावा, यासाठी समितीचे सर्व सदस्य प्रयत्न करतात. शिशूमंदिर विद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केलेले नारायण प्रसाद नरोलिया विद्यालयामध्ये वेळोवेळी जाऊन शिकवितात. याच सरकारी विद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले आहे. येथून शिक्षण घेऊन नरोलिया कृषी संचालक झाले, तर अवधेश शर्मा लेफ्टनंट झाले. काही विद्यार्थी डॉक्टरही झाले. तीन जणांनी पीएचडी पूर्ण केली आहे. आयएएस होण्यासाठी नागरी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गावाला भेट दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया नरसिंहपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या मनीष सिंह यांनी दिली आहे. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक बॅच गावाला भेट देण्यासाठी येऊन गेल्या आहेत.

संपर्क:- सुभाषजी

फोन क्रमांक : 7697335610

788 Views
अगली कहानी