नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
भालचंद्र जोशी | इंदूर | मध्यप्रदेश
वय वर्षे १७ हे काही मरणाचे वय नव्हे , पण १७ वर्षाचा तरुण स्वयंसेवक मनोज चौहान याने याच कोवळ्या वयात साक्षात मृत्यूला आव्हान दिले होते . केवळ पत्र्याचे पाण्याचे पिंप, आणि काठ्या, यांच्या साहाय्याने त्याने कित्येक लहान बालके, आणि स्त्री पुरुष यांचे प्राण वाचवले होते. ७ ऑगस्ट २००५ या दिवशी इंदूर शहरातील मारुती नगर येथून मनोजची अंत्ययात्रा सुरु झाली, तेंव्हा त्या दुःखद दिवशी ते सर्वजण शोकमग्न होऊन आसवे गाळीत होते. दोन दिवस त्या वस्तीत कोणाकडेही चूल पटली नाही, आणि संपूर्ण इंदूर शहरावरहि दाट शोककळा पसरली होती. २००९ साली प्रजासत्ताक दिनी या धाडशी आणि परोपकारी युवकाला केंद्र शासनातर्फे मरणोत्तर वीरता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याची अशी हि गौरवगाथा समस्त तरुण वर्गाला प्रेरक ठरू शकेल अशी आहे. यौवनाच्या उंबरठयावर सर्व साधारण युवक युवती जेंव्हा भावी जीवनाची सप्तरंगी स्वप्ने बघत असतात, त्या वयात मनोजने १८ जणांचे प्राण वाचवता वाचवता आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.
१ ऑगस्ट २००५ रोजी अतिवृष्टी मुळे इंदूर शहर जलमग्न झाले होते, सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरून तेथे हाहाकार मजला होता. बाणगंगेत सांवेर रोडवर मारुती नगर हि अशीच पाण्याखाली गेलेली वस्ती. तेथील घराघरात पुराचे असे तांडव सुरु झाले, की भांडी-कुण्डी, अंथरुण-पांघरुण, कपडेलत्ते, इतकेच नव्हे, तर लहान लहान मुलही, पाण्याबरोबर वाहून जाऊ लागली. त्या भागात मनोज चौहान हा संघाची शाखा नियमितपने लावत असे. बचाव कार्यासाठी शासनाची यंत्रणा पोहोचण्यापुर्वीच, मनोज अणि त्याचे शाखेतील सहकारी बबन पांडे, सुरेश बाथा इत्यादिंनी लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली होती. पत्र्याची पिंप, ट्यूब अणि काठ्या, ह्यांच्या मदतीने हे कार्य सुरु होते . मनोजने अनेक छोट्या मुलांना सुरक्षित स्थळी हलवले. वास्तविकपणे मनोजला हृदयाचा विकार होता. त्याच्या हृदयाच्या झडपा ख़राब झाल्या होत्या. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे नगर संपर्क प्रमुख डॉ. आनंद प्रकाश मिश्रा यांनी त्याला सावाधगिरिची सूचना दिली होती, आणि पाण्या पासून दूर रहायला सांगीतल होत, परन्तु मनोजच्या मनात " सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले" हे संघ गीताचे शब्द गुणगुणत होते. तो त्या सेवा कार्याच्या उर्मित पहाटे ४ पासून रात्री पर्यंत सतत पूरग्रस्तांची मदद करत होता. परन्तु इतरांना पुरातून वाचवता वाचवता त्याच्या स्वत: च्या फुफ्फुसांमधे मात्र पाणी भरले गेले. आपला स्वतः चा जीव धोक्यात घालून मनोजने १८ जणांचे प्राण वाचवले . दुसऱ्या दिवशीही तो पूरग्रस्तांसाठी धान्यधुन्य आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी धडपड करत राहिला.
अर्थातच या अतिश्रमांमुळे आणि पाण्यात कित्येक तास राहिल्यामुळे त्याला जबरदस्त न्यूमोनिया झाला, आणि मनोजला रुग्णालयात दाखल करावे लागले, असे तात्कालीन जिल्हा कार्यवाह गोपाळजी गोयल यांनी सांगितले. परंतु रुग्णालयातील उपचारांचाहि उपयोग झाला नाही, आणि अवघ्या दोन दिवसात मनोजची प्राणज्योत मालवली. त्याच्या मागे अपंग पिता उमरावसिंग चौहान, मनोरुग्ण भाऊ सोनू, आणि शोकानी टाहो फोडत असलेली माता यांचं दुःख, काय सांगावे. मारुती नगर वस्तीत राहण्याऱ्या लक्ष्मी देवी यांनी सांगितलं " मनोज हा देवदूतांसारखा धावून आला आणि माझ्या ७ वर्षाच्या नातवंडांचा जीव वाचवला . मृत्यूसमयी मनोजच्या खिश्यात पूरग्रस्त परिवारांच्या नावांची यादी, आणि त्यांना लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची यादी मिळाली.
२००७ साली भारतीय बालकल्याण परिषदेने
प्रजासत्ताक दिनी मनोजला वीरता पुरस्कार देण्याच्या निर्णय घेतला. त्यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिणे,
आणि इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण करणारे, प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्री राधे
श्याम सोमाणी, आणि डॉक्टर शेलेंन्द्र जैन हे अजूनही मनोजच्या आठवणीने सद्गदित
होतात.
प्रजासत्ताक
दिनी पुरस्कार प्राप्त मुलामुलींची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येते. मनोजला ते
सुख लाभले नाही, पण इंदूरमधील नागरिकांच्या ह्र्दयात मात्र त्याला अढळ स्थान
प्राप्त झाले आहे , असे
उदगार तात्कालीन जिल्हा सेवा प्रमुख अशोक अधिकारी यांनी काढले आहेत, ते किती सार्थ
आहेत, नाही का ?
संपर्क :– अशोक अधिकारी
मो.नं. : –
91 93008 98166
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।