नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
देविदास देशपांडे | उत्तराखंड
केदार खोऱ्यात आलेला जलप्रलय क्वचितच कोणी विसरला असेल. जीवन देणाऱ्या पाण्याला प्रलय होऊन कहर करताना, प्रेतांच्या दुर्गंधीत मानवतेला कण्हताना, यात्रेकरूंच्या असहायतेवर अलकनंदेला मौन अश्रू ढाळताना, आपण सर्वांनी आपापल्या घरात टीव्ही वाहिन्यांवर पाहिले. मात्र आपल्यापैकी कोणीही या अवघड क्षणांमध्ये यात्रेकरूंना सर्वात मोठा आधार ठरलेल्या मानवतेचे रूप नाही पाहिले. आपत्तीच्या क्षणात, कोसळत्या पाण्यामध्ये, कचऱ्याचा ढिगारा बनलेल्या रस्त्यांवर, प्राणघातक रस्त्यांवरून जात दिवसरात्र सेवा कार्यात मग्न झालेले संघाचे स्वयंसेवक. केदार खोऱ्यात पहिला हेलिपॅड तयार करण्यापासून ते अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेपर्यंत संघकार्य आजही चालू आहे.
आपल्यापैकी कोणीही योगेंद्र किंवा बृजमोहन बिष्ट यांचे नाव ऐकले नसेल. संघाच्या या दोन स्वयंसेवकांनी लष्कर व वायुसेनेच्या पोचण्याच्या आधीच हेलिकॉप्टरद्वारे यात्रेकरूंना सुरक्षित काढायला सुरूवात केली होती. ता. 16 व 17 जूनच्या भीषणा पावसाने सर्व काही उद्ध्वस्त केले होते. त्यात हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड कुठे मिळणार होते? तेव्हा आपल्या प्राणांची पर्वा न करता या धाडसी युवकांनी पॅराशूटमधून उडी मारून पहिला हेलिपॅड बनवले. त्यानंतर रामबाडा, केदारनाथ मंदिराच्या मागे आणि जंगल चट्टीतही त्यांनी लष्कराच्या पथकाच्या मदतीने हेलिपॅड बनवले. एवढेच नाही तर त्वरित रामबाडा, घोडापडाव आणि गौरीकुंड येथे अडकलेल्या यात्रेकरूंना हेलीकॉप्टरमधून काढण्याचे काम सुरू केले होते. कुठे कुठे तर त्यांना ५० फूट उंचीवरून दोरीच्या मदतीने खाली उतरून यात्रेकरूंना बाहेर काढावे लागले. म्हणजेच योगेंद्र व बृजमोहन यांनी लोकांना वाचवण्यासाठी ते सर्व केले जे लष्कराचे प्रशिक्षित जवान कठोर प्रशिक्षणानंतर करतात. पिनॅकल अॅव्हिएशन कंपनीचे कर्मचारी असलेल्या या युवा स्वयंसेवकांनी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कंपनीने मनाई केली असतानाही हे काम चालू ठेवले आणि आपली नोकरीही पणाला लावली. आता बोलूया गणेश अगोडा यांच्या विषयी. त्यांनी एका वृद्ध हार्ट पेशेंटचे प्राण वाचवण्यासाठी त्याला आपल्या खांद्यावर बसवून मंजगांव ते मनेरीपर्यंतचे 6किलोमीटरचे अंतर पार केले. अशा किती तरी कहाण्या खोऱ्यामध्ये तरंगत राहिल्या व विस्मृतीत गेल्या.
अडचणीच्या प्रत्येक प्रसंगात यात्रेकरूंसोबत कधी सेवक तर कधी पालक बनून उभे राहिले संघाचे स्वयंसेवक. मनेरी सेवाश्रम, चंबा येथील दिखोल गावापासून ऊखीमठजवळील भ्योंडाँडपर्यंतच्या 68 गावांमध्ये मदत शिबिरापासून ते भोजन, कपडे व भांड्यांपर्यंत गरजेची प्रत्येक वस्तू वाटण्यात आली. एकट्या मनेरीत 10,000 यात्रेकरूंनी भोजन केले. दिखोल येथे 20,000 लोकांना मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. चमोलीचे सरस्वती शिशु मंदिर असो वा मनेरीतील सेवाश्रम – दोन्ही ठिकाणी अनेक दिवस मदत शिबिर चालू राहिले. यात्रेकरूंपासून लष्कराच्या जवानापर्यंत सर्वांनी तेथे जेवण केले.
आपत्ती दूर होताच अन्य संघटनांनी तेथून आपले चंबूगबाळे आवरले आणि सरकारी मदतीचा वेगही मंदावला. मात्र उत्तराखंड दैवीय आपदा समितीच्या माध्यमातून संघाचे कार्य चालू राहिले. गौरीकुंड, रामबाडा, सोनारचट्टी ,सोनप्रयाग यांच्यासह संपूर्ण केदार खोऱ्यात विनाश झाला होता. स्थानिक लोकांचे घरादारासहित रोजगारही हिरावले गेले होते. जगण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. तेव्हा समितीने पुनर्वसनाचे काम सुरू झाले होते व अजूनही करत आहे. समितीचे संघटनमंत्री राजेश थपलियाल यांच्या म्हणण्यानुसार, जलप्रलयात अनाथ झालेल्या 6 ते 12 वर्षे वयाच्या 200 मुलांसाठी नैठवाड, लक्षेश्वर, कोटी कॉलोनी आणि गुप्तकाशीतील चार हॉस्टेल सुरू आहेत. अजूनही काही गावांतील वीज आलेली नाही. या गावांमध्ये सोलर दिवे वाटण्यात आले आहेत.
पीडित गावांतील 100 गरीब मुलांचे शिक्षण कायम ठेवण्यासाठी 1000 रुपयांची शिष्यवृत्तीही देण्यात येत आहे. उषाडा, स्यानट्टी यांसह आठ गावांमध्ये मेडिकल सेंटर चालवले जात आहेत. उद्ध्वस्त झालेल्या गावांतील विधवा व बेरोजगार युवकांसाठी शिलाई व संगणक केंद्रे चालवण्यात येत आहेत. इतकेच नाही तर मुलांना शिकवण्यासाठी प्राथमिक पातळीवर 4 शिशुमंदिर व 8 बालसंस्कार केंद्रही खोऱ्यात चालवण्यात येत आहेत. नारायण कोटी येथे 30 खाटांचे रुग्णालयही सुरु झाले असून तेथे आपत्तीतील पीडितांवर जवळजवळ मोफत उपचार होतात. चार वर्षांच्या काळात हा जलप्रलय सर्व जण विसरून गेले मात्र समितीच्या माध्यमातून स्वयंसेवक आताही पुनर्वसनाच्या कामात मग्न आहेत.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।