सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

कात्रे गुरुजींची निरंतर साधना

सतीश कुंटे | छत्तीसगड

parivartan-img

कुष्ठरोगाच्या नुसत्या कल्पनेनेच मनाचा थरकाप होतो. सडलेले हातपाय, जखमा, समाजाने जवळपास बहिष्कृतच केलेले रुग्ण आणि यातना भोगणारे कुष्ठरोगी असे भीषण चित्र नजरेसमोर उभे राहते. ५० वर्षांपूर्वी कुष्ठरुग्णांचे नातेवाइक जेव्हा अशा रुग्णांना शाप समजून दूर लोटत होते, त्या वेळी कुणीतरी त्यांना आपल्या मायेच्या पदराखाली घेतले आणि त्यांच्या सगळ्या दुःखाचा भार सोसला. त्यांच्या जखमांवर आपुलकीचा लेप लावला. त्यांना सक्षम व समर्थ बनवून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला. मध्य प्रदेशातील चांपा येथे सर्वांत मोठ्या कुष्ठरोग निवारण केंद्राचा पाया रचणाऱ्या सदाशिव गोविंदराव कात्रे यांना संघातील आम्ही सर्वजण कात्रे गुरुजी नावाने ओळखतो. त्यांना स्वत:ला कुष्ठरोग होता. कुष्ठरोगामुळे हाता-पायांवर परिणाम झाला असला, तरी तशाच वेड्यावाकड्या हातापायांनी तासन् तास सायकल चालवून कात्रे गुरुजींनी गावोगाव भटकंती केली आणि कुष्ठरुग्णांसाठी एक-एक मूठ धान्य गोळा केले. गुरुजींच्या सेवाकार्याची सुरुवात अशी झाली. गोळवलकर गुरुजींच्या प्रेरणेने एका कुष्ठरुग्णाच्या आयुष्यात सेवेचा दीप प्रज्ज्वलित झाला. त्याने पुढील पिढ्यान् पिढ्या उजळून निघतील.




चांपा येथील कुष्ठरुग्ण निवारण केंद्र आज कुष्ठरुग्णांचा स्वर्ग समजले जाते. येथे उपचारांसोबतच रुग्णाला आपुलकी, स्नेह व संस्कारयुक्त अशा सरस वातावरणदेखील अनुभवायला मिळते. मेणबत्त्या बनविणे, सतरंज्या विणणे, दोरखंड बनविणे, चाके बनविणे अशी विविध कामे करून इथले रोगी स्वाभिमानाने जगतात. येथील सुमारे तीनशे कुष्ठरुग्णांच्या मुलांच्या शिक्षणासाठी येथे एक अद्ययावत विद्यालय व वसतिगृह सुसज्ज आहे.




मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्याच्या अरोन गावात राहणाऱ्या गोविंद कात्रे व राधाबाई यांचा मुलगा सदाशिव हा तीन बहिणींमधील एकुलता एक भाऊ होता. केवळ आठ वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे सदाशिवाचे संपूर्ण आयुष्य परिस्थितीशी झगडण्यात गेले. माध्यमिक शिक्षणानंतर रेल्वेमध्ये नोकरी करीत असतानाच ते संघामध्ये दाखल झाले. १९४८ साली संघावर लादलेल्या बंदीमध्ये त्यांना सहा महिने तुरुंगवासदेखील झाला. आयुष्यभर त्यांना खूप संघर्षाच्या काळातून जावे लागले. त्यांची पत्नी बायोताई हिचा अकाली मृत्यू झाला. बहिणीकडे सुरक्षित म्हणून ठेवलेली संपत्ती व दागदागिने बहिणीने लंपास केले. कुष्ठरोगाने शरीर जर्जर झाले होते. जवळ पैसा-अडका नव्हता आणि आपले म्हणावे, असेही कुणी राहिले नव्हते. ज्या मिशनरी हॉस्पिटलमधे गुरुजींनी उपचार घेतले तेथे उपचारांआड चाललेल्या धर्मांतराला विरोध केल्यामुळे गुरुजींना तेथून हाकलून देण्यात आले. जेव्हा सगळेच मार्ग खुंटले त्या वेळी त्यांची भेट गोळवलकर गुरुजींशी झाली आणि त्यांना कुष्ठरुग्णांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. गोळवलकर गुरुजींची भेट घेतल्यानंतर कात्रे गुरुजींनी समाजाने बहिष्कृत केलेल्या व जिवंतपणी नरकयातना भोगणाऱ्या आपल्यासारख्या कुष्ठरुग्णांच्या जीवनाचा उद्धार करण्याचा निर्धार केला.

सौंठी गावाजवळील घोगरा नाला येथील कुष्ठरुणांच्या वस्तीमधील एका छोट्याशा झोपडीमध्ये दोन कुष्ठरुग्णांची मलमपट्टी व त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. पायावरील जखमांमुळे त्यांना चालता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षी सायकल शिकून घेतली. कठड्याच्या साह्याने सायकलवर स्वार व्हायचे आणि चांपाजवळील अफरी, लखुर्री, बिर्रा अशा गावांमध्ये तब्बल वीस-वीस किलोमीटर सायकल चालवून कुष्ठरुग्णांसाठी ते धान्य गोळा करायचे आणि परत येऊन स्वयंपाकदेखील करायचे. रुग्णांना जेवण करून देण्याबरोबरच त्यांची मलमपट्टीदेखील ते करायचे. रुग्णसेवेचा त्यांचा असा दिनक्रम झाला होता. काही ठिकाणी धान्य मागताना केवळ अपमान, घृणा आणि तिरस्कारच वाट्याला यायचा. पेलाभर पाणीदेखील अनेकदा त्यांना मिळायचे नाही. पण, कात्रे गुरुजींनी हार मानली नाही. कुष्ठरुग्णांची संख्या वाढल्यावर त्यांना सहकार्य करण्यासाठी काही सहकारी मिळाले. चापा येथे आश्रमासाठी जेव्हा जमीन दानरूपात मिळाली, तेव्हा रेल्वेमधील नोकरी सोडल्यावर मिळालेल्या पुंजीमधून कात्रे गुरुजींनी तेथे चार खोल्या बांधल्या.




हळूहळू तेथे आणखी रुग्ण राहण्याची सोय करण्यात आली व गोशाळा देखील बांधण्यात आली. आजमितीला ८५ एकर जमिनीवर वसलेल्या भारतीय कुष्ठ निवारक संघात तीनशेपेक्षा अधिक कुष्ठरुग्ण सेंद्रीय शेती करतात. हा एक असा आत्मनिर्भर प्रकल्प आहे, जेथे दीडशे गोबर गॅस प्लांट कार्यरत आहेत. शेतीमार्फत जवळपास एक हजार पोती डाळी, तांदूळ व इतर आवश्यक अनेक गोष्टी येथे घेतल्या जातात. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था जवळच्याच ‘माधव सागर’ तलावातून केली आहे.




आश्रमात असलेल्या कात्रे गुरुजींच्या मूर्तीला नमन करून येथील व्यवस्थापक दामोदर बापट सांगतात, की ज्या पित्याला एकुलत्या एक मुलीच्या सासुरवाडीहून अपमानित करुन हाकलून देण्यात आले होते, त्याच पित्याने शेकडो कुष्ठरुग्णांचा स्वाभिमान जपला आणि त्यांना एक चांगले जीवन जगण्यास सक्षम बनविले. कात्रे गुरुजी आता आपल्यामधे नाहीत. पण, त्यांनी प्रज्ज्वलित केलेली सेवाव्रताची मशाल कुष्ठरुग्णांच्या अंधारमय जीवनाला अखंडपणे प्रकाश देत राहील.

1257 Views
अगली कहानी