सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

दक्षिणेतील संघ अग्रणी-यादवराव जोशी

कर्नाटक

parivartan-img

एका मध्यम चणीच्या सर्वसामान्य वाटणाऱ्या संगीतज्ञ मराठी तरुणाने आपल्या जीवनातील तब्बल 50 वर्षे संघ तपस्या केली आणि त्याद्वारे संघटन-क्षेत्रात एक नवा इतिहास घडवला. या महान कर्तृत्वशाशाली व्यक्तीचे नाव आहे यादवराव जोशी. कर्नाटकात संघाचा प्रचारक म्हणून जाण्यापूर्वी यादवरावांनी क्वचितच कन्नड भाषा ऐकली असेल, पण एकदा कर्नाटकात येवून दाखल झाल्यावर त्यांनी तेथे स्वत:ला ठामपणे जोडून घेतले अणि सर्व कन्नड भाषक समाजावर आपल्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा अमीट ठसा उमटवला. त्यांनी कधीही आपले अनुयायी तयार करण्याचा खटाटोप केला नाही; परंतु त्यांच्या तप:पूत सेवाभावी जीवनक्रमामुळे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाउल ठेवून संघकार्य करू शकले. यादवरावांनी सुरू केलेल्या विविध कामांचा, संस्थांचा व्याप थक्क करणारा आहे. त्यांनी स्थापन केलेली राष्ट्रोत्थान परिषद एकीकडे गरजू रूग्णांसाठी बेंगळुरूमध्ये सर्वांत मोठी रक्तपेढी चालवत आहे. येथे गरीब रूग्णांना सवलतीच्या दरात रक्तपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे झोपडपट्टीतील मुलांसाठी मोफत अभ्यास वर्ग चालवले आहे. केरळमध्ये लहान मुलामुलींना भारतीय संस्कृतीशी जोडणाऱ्या बालगोकुळम् या उपक्रमाचे प्रेरणास्रोत यादवरावच होते.




यादवरावांचा जन्म 3 सप्टेंबर 1914 रोजी अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी नागपूर येथे एका वेदशास्त्रसंपन्न घराण्यात झाला. त्यांचे लहानपण अतिशय हलाखीच्या अभावग्रस्त वातावरणात गेले. एम.ए. अणि त्यानंतर कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरीधंदा करून पैसे मिळवावे आणि घरचे दारिद्र्य दूर करावे अशी कुटुंबीयांची स्वाभाविक इच्छा होती. पण, शिक्षण पूर्ण होताच यादवराव संघाचे प्रचारक होऊन काम करू लागले. संपत्ती, प्रतिष्ठा, नावलौकिक हे त्यांचा पायाशी चालून आले होते. पण, त्या सर्वांकडे त्यांनी पाठ फिरवली. अगदी लहानपणीच त्यांनी संगीतात विलक्षण प्रावीण्य मिळवले होते. बाल भास्कर म्हणून ते ओळखले जात असत. त्यांच्या संगीत क्षेत्रातील अधिकारास, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांनीही दाद दिली होती. पण, संघ कार्यासाठी यादवरावांनी संगीत सेवेचाही मोह, कर्तव्यकठोर भावनेने दूर केला. ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही संघाची प्रार्थना सर्वप्रथम म्हणण्याचा मान यादवरावांनी मिळवला.

1948 साली गांधी हत्येनंतर आणि 1975 साली आणीबाणीत संघावर बंदी घालण्यात आली, त्या दोन्ही प्रसंगी यादवरावांना तुरुंगवास भोगावा लागला. पण, दोन्ही वेळी पुन्हा नव्या जोमाने ते संघकार्यात रममाण झाले. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या दक्षिणेतील चारही राज्यांत त्यांनी रक्ताचे पाणी करून संघकार्याचा मजबूत पाया घातला.




सेवाव्रती हे घडवता येतात, प्रशिक्षित करता येतात यावर त्यांचा दृढ विश्वास होता. या विश्वासापोटीच त्यांनी बेगळुरू येथे हिंदू सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून तरूण मुलामुलींना सेवाकार्याचे प्रशिक्षण देउन तीन-तीन वर्षांसाठी ग्रामीण भागात पाठवण्यात येवू लागले. आतापर्यंत असे 5 हजार प्रशिक्षित सेवाव्रती घडवण्यात आले आहेत. यापैकी कित्येक जणांनी आपले संपूर्ण आयुष्यच सेवा कार्याला वाहिले आहे. यादवराव हे संघाचे पहिले अघोषित अखिल भारतीय सेवा प्रमुख झालेत. त्यांनीच संघाच्या सेवा विभागाची उभारणी केली. अशा या महान कर्मयोग्यास शत शत प्रणाम.

1428 Views
अगली कहानी