सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

सूर्य नारायण रावजी-स्वयंसेवकांच्या पुरुषार्थाला सेवा कार्याशी जोडणारे कुशल संघटक

सेवागाथा | महाराष्ट्र

parivartan-img

स्वयंसेवकांच्या पुरुषार्थाला सेवा कार्याशी जोडणारे  कुशल संघटक- सूर्य नारायण रावजी 

काही व्यक्ती  इतिहासाचे अभिन्न अंग असतात परंतु काही व्यक्ती मात्र स्वतःच इतिहास घडवतात . ही कहाणी आहे अशाच एका युवकाची ज्याने दक्षिण भारतामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य करताना इतिहास घडवला.

संघामध्ये 'सुरुजी' या नावाने लोकप्रिय असणारे स्वर्गीय सूर्यनारायण रावजी यांचे जीवन हा सेवा-भावाला नवीन परिमाणे देणारा आणि स्वयंसेवकांच्या पुरुषार्थाला  संवेदनेशी  जोडणारा एक आगळा वेगळा प्रवास आहे.  वयाच्या केवळ २२ व्या वर्षी संघाचे प्रचारक म्हणून निघालेल्या सूर्यनारायण रावजी यांनी तामिळनाडूमधील फुटीरतावादी शक्तींच्या प्रयत्नांना निष्फळ ठरवत सर्वसामान्य माणसांमध्ये सामाजिक समरसतेचं बीज पेरलं.  'प्रत्येक शाखेने एका सेवा कार्याची जबाबदारी घ्यावी' असा मंत्र देत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाची रचना करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

२० ऑगस्ट १९२४ रोजी कर्नाटक मधील मैसूर येथे  जन्मला आलेले सुरूजी.. संघाचे पहिले सेवा विभाग प्रमुख म्हणून १० वर्षे अव्याहत  प्रवास करून  त्यांनी स्वयंसेवकांना सेवा  कार्याशी जोडलच पण त्याचबरोबर  देशभर सुरू करण्यासाठी विविध सेवा कार्यांची योजनाही त्यांनी साकार केली. कर्नाटकातील मैसूर संस्थानात सचिव म्हणून काम करणारे कोरडगेरे कृष्णप्पा; यांची पत्नी सुंदरम्मा यांनी जेव्हा आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला तेव्हा त्या माऊलीला काय ठाऊक होतं की आपल्या पोटी जन्माला आलेलं बालक भविष्यात इतकं यशस्वी होईल!!   सुरूजींना लहानपणीच संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांचे सानिध्य लाभले. गुरुजी जेव्हा प्रवासा निमित्ताने कर्नाटक मध्ये येत तेव्हा या परिवारामध्ये आवर्जून जात असत . राष्ट्रभक्त असणार्‍या आई-वडिलांच्या संस्कारांचा प्रभाव असा होता की गणित विषयामध्ये 'ऑनर्स पदवी' प्राप्त करून वयाच्या २२ व्या वर्षी सूर्यनारायण रावजी यांच्या  प्रचारक जीवनाची सुरुवात झाली. आपल्या प्रचारक जीवनात सुरूजी यांनी अनेक भूमिका निभावल्या. पण ज्या भूमिकेची आज आपण विशेषत्वाने चर्चा करत आहोत त्या भूमिकेतून त्यांच्या संघटन कौशल्याची अद्भुत शक्ति संपूर्ण देशाने  अनुभवली आणि वाखाणली.


१९७२ मध्ये जेव्हा सूर्यनारायण रावजी यांच्यावर तमिळनाडूचे प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवली गेली तेव्हा त्या प्रांतात भाषिक फुटीरतावाद शिगेला पोचला होता . त्यांना तमिळ भाषा येत नव्हती परंतु त्यांनी तमिळ शिकून घेतली आणि समाजातील सर्व वर्गांना संघ कार्याशी जोडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १९८४ पर्यंत सतत १३ वर्षे ते तमिळनाडूचे प्रांत प्रचारक म्हणून देशप्रेमी युवकांमध्ये धैर्य  जागवण्यासाठी तसेच सामाजिक समरसता  निर्माण करण्यासाठी अथक कार्य करत होते. त्यांच्याबद्दल बोलताना १२ वर्षे संघाचे सरकार्यवाह राहिलेले माननीय भैयाजी जोशी सांगतात," सूर्यनारायण रावजी यांनी एकीकडे समाजाचा आत्मगौरव जागवण्यासाठी प्रयत्न केले तर दुसरीकडे  दलित बांधवांना पूजापाठ आणि पौरोहित्याचे प्रशिक्षण देऊन मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले." असा समाज ज्यांच्यापासून सर्वसामान्य माणसे अंतर राखून राहत असत ते जेव्हा पुजारी म्हणून प्रतिष्ठित झाले तेव्हा समाजाची दृष्टी सुद्धा  बदलली. फुटीरता वादाला तिथेच खतपाणी मिळतं ज्या ठिकाणी परस्परांमध्ये दुरावा वाढीला लागतो. जेव्हा मंदिरांचे दरवाजे सर्वांसाठी उघडले गेले त्यावेळी सौहार्दपूर्ण अशा वातावरणाने फुटीरता वादाची मूळं आपोआप कमकुवत झाली.  

सुरुजींसह अखिल भारतीय सह सेवा प्रमुख म्हणून त्यांचे सहकारी  असलेल्या भैयाजी जोशी यांच्या मते सुरुजींच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता.  विवेकानंदांचा  मंत्र 'नरसेवा हीच नारायण सेवा'.  हाच जीवनमंत्र मानून ते स्वयंसेवकांना सांगत असत, ' कुणालाही भौतिक सोयी सुविधा मिळवून देणं ही प्राथमिक स्तरावरची सेवा आहे परंतु ज्याची सेवा करायची त्याची पूजा करत; त्याला परमेश्वरा समान मानून सेवा कार्य करणे आवश्यक आहे.  प्रत्येक सेवा घेणाऱ्या व्यक्तीला सेवा  देणारा बनवणं, त्यातुन कार्यकर्ता घडवणं हीच खरी सेवा आहे.  त्यांच्या मनमिळावू स्वभावा मुळे  प्रत्येक  कार्यकर्त्याला ते  आपलेसे वाटत असत आणि यामुळेच  त्यांचे विचार स्वयंसेवकांच्या मनामध्ये  आणि बुद्धीमध्ये रुजवण्याचं काम ते करू शकले.  १९९० मध्ये जेव्हा सुरूजींनी पहिले अखिल भारतीय सेवा प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हा सेवा विभाग हा संघामध्ये एक नवीन प्रयोगच होता.  कोणत्याही विषयात प्रयोगशीलता ही नेहमीच आव्हानांनी भरलेली असते.  आणि आव्हान स्वीकारणं हाच तर सुरुजींचा स्वभाव होता.  ते कार्यकर्त्यांना विविध प्रयोग करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देत असत आणि म्हणूनच संघाचे पहिले अखिल भारतीय सेवा प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये सेवा विभागाला योग्य ती गती आणि दिशा मिळाली.  'संस्कार केंद्र संपूर्ण वस्तीचा कायापालट करण्यास सक्षम बनतील'  सूर्यनारायण रावजी यांची ही कल्पना आज संपूर्ण देशामध्ये चालत असलेल्या संस्कार केंद्रांमध्ये होणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाचा आधार झाली आहे. 

'संघाचे चालते बोलते अभिलेखागार' असं ज्यांना म्हटलं  जातं ते सुरुजी एक प्रखर बुद्धिमान असे विद्वान होते.  त्यांच्या सहवासामध्ये ज्यांचं आयुष्य घडलं  ते दक्षिण क्षेत्राचे सह बौद्धिक प्रमुख गोविंदजी सांगतात की "सूर्यनारायण रावजी  यांचे हिंदी ,इंग्रजी आणि तमिळ या तीनही भाषांवर उत्तम प्रभुत्व होते.  जेव्हा कधी बुद्धीजीवी लोकांमध्ये संघकार्याची मांडणी करण्यासाठी सुरुजी जायचे तेव्हा ओघवत्या वाणीत इंग्रजीमध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने ते असा विषय मांडत असत की अनेक विद्वान व्यक्तींना ते  संघटनेशी जोडण्यास यशस्वी होत. ते सांगतात की सूर्यनारायण रावजी त्यांच्या प्रवासादरम्यान नेहमी  ते वाल्मिकी समाजातील स्वयंसेवकांच्या घरीच भोजन घेत असत.  विशेषतः मेहतर  समाजातील बांधव ज्यांना समाजाने अस्पृश्य  मानलं; त्यांच्या घरी सुरूजी अतिशय आनंदाने भोजनासाठी जात. स्वयंसेवकांना ते सांगत," जसं लहानपणी आपली आई आपली स्वच्छता करते, तसंच हा समाजही आपल्या घरांना स्वच्छ करत असतो. आपण आपल्या आईला कधी अस्पृश्य मानतो का?  खरंतर आपण यांचे आभार मानले पाहिजेत"  या समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांनी  यशस्वी प्रयत्न केला . १९८९ मध्ये जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचे  निश्चित झाले तेव्हा पहिल्यांदा या मोठ्या कार्याला निधी ची आवश्यकता निर्माण झाली. सेवा कार्यांच्या  विस्तारासाठी पैशांची व्यवस्था करणे, त्या संदर्भातील कायदेशीर बाबींची पूर्तता करणे या कामासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याची कल्पना श्री सूर्यनारायणजी यांच्या प्रेरणेतूनच पुढे आली . आणि २००३ मध्ये राष्ट्रीय सेवा भारती चा जन्म झाला.  इतकच नाही तर प्राप्त राशीचा विनियोग कुठे  होत आहे आणि त्याचे फलस्वरूप काय येत आहे याची माहिती समाजाला देण्यासाठी सुरुजी यांच्या प्रेरणेतूनच 'सेवा दिशा' पत्रिकेचं प्रकाशन करण्यास सुरुवात झाली.


 2013 मध्ये करूर (तामिळनाडू) संघ शिक्षण वर्गाचा समारोप समारंभ

अखिल भारतीय सेवा प्रमुख असताना दहा वर्ष अव्यहातपणे त्यांनी देशातील कानाकोपऱ्यात प्रवास करत 'सेवा हे यज्ञ कुंड, समिधासम हम जले' हा संदेश सर्वत्र पोहोचवला. योग्य वेळ येताच सेवा विभागाची सर्व जबाबदारी येणाऱ्या पिढीकडे सोपवली पाहिजे या विचारानेच सुरूजीनी वयाच्या ७५ व्या वर्षी आपल्या जबाबदारीतून आपल्याला दायित्व मुक्त करण्यासाठी वरिष्ठांना विनंती केली.  एक महान संघटक, एक शक्तिशाली प्रचारक, अतुलनीय संचारक आणि एक सक्षम टीम लीडर असणारे माननीय सूर्यनारायण रावजी मृत्यूपूर्व काही वर्षापर्यंत केंद्रीय टोळीचे सदस्य होते . आणि जोपर्यंत तब्येतीची साथ होती तोपर्यंत ते दक्षिण भारतातील प्रत्येक संघ शिक्षा वर्गामध्ये जाऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत होते.  १९ नोव्हेंबर २०१६ रोजी बंगलुरु येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेण्यापूर्वी दोन आठवडे आधीपर्यंत ते स्वयंसेवकांना भेटत होते. संघकार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करत होते.  

 अनुवाद: सुचिता रमेश भागवत.

180 Views
अगली कहानी