सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

वैदिक परंपरांचे पुनर्जागरण-सुरभि शोध संस्थान वाराणसी

सौ. विद्या सतिश कुंटे | उत्तर प्रदेश

parivartan-img

त्रिपुराच्या मुक्तिची बासरीची धून आणि नेपाळच्या आशाच्या ढोलकीवरच्या थापेवर रंगलेले कृष्णाचे भजन ऐकून मन भरून आले. पूर्वोत्तर राज्यातील ह्या मुलांना हिंदी भाषेतील गाणी गाताना ऐकून गोशाळेतील गाई सुध्दा डोलत होत्या. वाराणासीच्या "सुरभि शोध संस्थाना" बद्दल सांगायचे झाले तर सध्याच्या काळात भौतिक प्रगती करत असताना लुप्त होत चाललेली शिक्षण पद्धती, कृषि पद्धती, तसेच वैदिक परंपरांचे पुनर्जागरण येथे केले जात आहे.  

साधी रहाणी व उच्च विचारसरणी हे आचरणात आणणारे संघाचे स्वयंसेवक श्री सूर्यकांत जालान ह्यांच्या प्रेरणेने १९९२ साली ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली. वापरात नसलेल्या गोशाळांमध्ये काही गाई आणि निरुपयोगी म्हणून कसायांना विकल्या गेलेल्या गाईंना सोडवून आणून आश्रय देऊन त्यांची सेवा करुन येथील काम सुरु झाले. कालांतराने त्याला पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थांसाठी  शिक्षण प्रकल्पाची जोड देण्यात आली.




२००० साली स्वावलम्बी झालेल्या गोशाळेत वसतीगृह सुरु झाले. पुर्वोत्तर राज्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रातील वनवासी जमातीतील २२ मुलांनी वसतीगृहाची सुरुवात झाली. आज ह्या वसतीगृहात पूर्वोत्तर राज्यातील दुर्गम भागातील ६०० विद्यार्थी निःशुल्क आधुनिक शिक्षणा बरोबर संगीत,  पाककला, जैविक शेती, गोपालन, कृषि विज्ञान, जल, भूमी आणि पर्यावरण संरक्षण अशा मूलभूत आणि जीवनोपयोगी विषयांचे ज्ञान ग्रहण करीत आहेत. तसेच आतंकवाद आणि नक्षलवादापासून पूर्णपणे उलट वेगवेगळ्या संस्कृती आणि संस्कारांमध्ये समरसता आणि सामंजस्य स्थापन करीत आहेत. इथूनच शिकून बाहेर पडलेले सोनम भूटिया, सिक्कीम महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी आहेत आणि एम्. फील. करत आहेत. त्याचबरोबर येथील काही विद्यार्थी सिक्कीम आणि नागालँड मध्ये हिंदी शिकवत आहेत. जालानजी अतिशय अभिमानाने सांगतात की, येथून शिकलेले नारबू लेप्चा, सिक्कीम मध्ये वनमंत्र्यांचे सेक्रेटरी आहेत. संगीताचे नियमीत शिक्षण घेऊन सिक्कीमचे सचकूम अल लेप्चा स्वतःचा यूट्यूब चॅनेल यशस्वीपणे चालवत आहेत. वसतीगृहाचा कार्यभार सांभाळणारे संघाचे माजी प्रचारक श्री. हरीश भाई सांगतात की, पूर्वोत्तर राज्यातील सामाजिक परिस्थितीमुळे येथील अनेक मुले शेतकरी परिवारातील, काही अनाथ, तर काही एकाकी पालकांची मुले आहेत. तिसरी किंवा चौथीतून आलेल्या मुलांकरिता संस्थानच त्यांचे कुटुंब आहे. उच्च शिक्षणापर्यंत त्यांना पूर्ण सहकार्य केले जाते. 




संस्थेच्या परिसरात असलेल्या चार वसतीगृहात जवळजवळ ४२४ मुले आणि एका वसतीगृहात जवळजवळ १७८ मूली राहात आहेत.  आत्मनिर्भरतेचे बीजारोपण करीत असतानाच मुलांमध्ये हिंदी भाषिक असल्याचा गर्व आणि सुंदर भविष्याची स्वप्ने जागृत केली जात आहेत. प्रत्येक घर आत्मनिर्भर व्हावे आणि प्रत्येक व्यक्तीने  मेहनतीने आणि आपल्या क्षमतेने स्वतःच्या गरजा भागवाव्या ह्या उद्देशाने संस्थेत अनेक उपक्रम राबवले जातात. गोशाळेच्या संपर्कामुळे गावातील अनेक समस्या, जसे ओसाड जमिनी, पाण्याची कमतरता, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, शेती विषयक अडचणी समोर आल्या. प्राचीन पद्धत लक्षात घेऊन अनेक महिने ओसाड जमिनींचे,  गोमूत्र आणि शेणाने पोषण करण्यात आले. डोंगरांवरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडविण्यासाठी ठिकठिकाणी छोटेछोटे तलाव निर्माण केले. तसेच धरणे आणि नाले अडवून  पाणी वाचविण्यावर भर दिला गेला, त्यामुळे ओसाड जमिनीवर हिरवळ दिसू लागली. गावात सेंद्रिय शेती, वृक्षवाटिका, वृक्षारोपण ह्या गोष्टी वाढल्या. गो पालनापासून शेतीच्या अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा उघडण्यात आल्या. 



   

संस्थेचे प्रमुख कार्यकर्ता असलेले श्री. जटाशंकरजी सांगतात की, “उत्पादन घट झाल्यामुळे विषण्ण झालेल्या शेतकऱ्यांना प्रगत शेती करण्यासाठी  शिक्षीत करण्यात आले, व त्यामुळे लुप्त होत चाललेल्या भाज्या, फळे आणि वनस्पतींचे रक्षण केले गेले. फक्त तपोवनच्या शाखेमध्ये आज जवळजवळ ६०००० झाडे व वनस्पती आहेत. ज्यात २५ प्रकारच्या फळं-भाज्या, २० प्रकारच्या जडीबुटी, गाईंचा चारा, मसाले ह्यांचे उत्पादन होत आहे. स्वतःच्या हाताने काम करणे, झाडे लावणे, गो सेवा करणे, ह्यामुळे मुले आपोआपच निसर्गप्रेमी होत आहेत.

हल्ली शहरात किंवा गावात खाण्याचे हाल होत नसले, तरी स्त्रीचा सन्मान न होणे आणि मुलांच्या वाढत जाणाऱ्या लहानसहान इच्छा, ह्या गोष्टी मात्र गृहिणीला अस्वस्थ करीत आहेत. त्यातच घरातील हिंसाचार, नवऱ्याचे दारुचे व्यसन अशा गोष्टी घरात कलह निर्माण करतात. गेल्या सहा वर्षांपासून येथे काम करणारी सविता मौर्या, आत्मविश्वासपूर्वक सांगते की लॉकडाऊन मध्ये सुध्दा शिलाई मशीनवर काम कारणारे आमचे हात थांबले नाहीत. आता घरातील मान-सन्मान आणि मुलांचा आनंद दोन्ही आमच्या हातात आहे. राजलक्ष्मी, दुर्गा, आशा यांच्या सारख्या जवळजवळ ५०० महिला आज शिवणकामाचे निःशुल्क प्रशिक्षण घेऊन येथूनच पैसे पण कमावत आहेत. संस्थेमध्ये पापड, लोणची, मोरांबे, मसाले, गुलकंद असे घरगुती उद्योग करुन आत्मनिर्भर झालेल्या गावातील महिलांचे जीवनमान चांगलेच सुधारले आहे. 

ग्रामीण भागात दर २८ दिवसांनी डगमगपूर आणि मिर्जापूर प्रकल्पात स्वास्थ्य शिबिरांचे आयोजन केले जाते. जिथे डॉक्टर एस. के. पोद्दारांसारखे अनेक निष्णात डॉक्टर आपला वेळ देऊन स्वास्थ्य आणि मिर्गी रोग यांच्या बद्दल जागरुकता निर्माण करीत आहेत. आतापर्यंत जवळपास ५००० रुग्णांनी निःशुल्क तपासणीचा लाभ घेतला आहे. प्रत्येक आरोग्य शिबिरामध्ये कमीत कमी ११०० लोकं ह्या सेवेचा लाभ घेत आहेत. भारतीय संस्कृतीनुसार गाईमध्ये सर्व देवतांचा वास आहे अशी मान्यता आहे. ज्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे हा प्रकल्प; ज्याची सुरुवात एका साध्या  गोशाळेने झाली आणि आज हा प्रकल्प, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये क्रांतीकारी परिवर्तनाचे आदर्श उदाहरण बनला आहे.


704 Views
अगली कहानी