नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
हरियाणा
हरियाणामधील चरखी दादरी जिल्ह्यातील तो भीषण अपघात सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवून देणारा होता. आकाशातून उल्का अथवा वीज पडल्यानंतर जसा भयकंप तयार होतो, अगदी तसाच भयकंप या जिल्ह्यात झाला होता. वीज पडल्यानंतर झालेला तो भयकंप नव्हता, तर हवेतल्या हवेत विमानांची जोरदार टक्कर होऊन विमानांचे तुकडे खाली आले होते. हवेतल्या हवेत टक्कर झालेला जगातील सर्वांत मोठा असा तो अपघात होता आणि भारताच्या इतिहासामधीलसुद्धा हा सर्वांत मोठा विमान अपघात होता. 12 नोव्हेंबर 1996 रोजी या दिवशी घडलेला भीषण अपघात कुणाच्याच स्मरणातून जाणार नाही. दिल्लीहून अरबस्तानाकडे जाणारे एक विमान आणि दिल्लीकडे येणारे कझाकस्तान एअरलाइन्सच्या विमानांची टक्कर झाली होती. सुमारे 351 जणांसाठीचा हा अखेरचाच क्षण ठरला. सौदी विमानातील 312 जण, तर कझाकस्तान विमानातील 37 जणांचा जागीच मृत्यू झाला. चरखी दादरीच्या आसपास चार पाच किलोमीटर अंतरावरील ढाणी फौगाट, खेडी सोनावाल आणि मालियावास गावातील शेतांमध्ये विमानांच्या अवशेषांचा, मृतांचा खच पडला होता. या अशा बिकट प्रसंगी मदतीला सर्वांत पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक धावून आले. सरकारी मदत पोहोचण्यापूर्वी संघाच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळावर येऊन मदतीचे कामही सुरू केले होते.
अपघातामध्ये एखादा तरी कुणी वाचला असेल का, हे पाहण्यासाठी भिवानी जिल्ह्याचे तत्कालीन संघचालक श्री. जीतराम जी इतर स्वयंसेवकांबरोबर घटनास्थळी पोहोचले. तेथील हृदयद्रावक दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांनी एकही क्षण न गमावता तासाभराच्या आतच पेट्रोमॅक्स, जनरेटर, पाणी इत्यादी आवश्यक सामग्री जमा केली. अतिशय थंडी असतानाही स्वयंसेवकांनी पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात विमानातील एखादा प्रवासी वाचला आहे का, हे पाहण्यास सुरुवात केली. अखेरच्या घटका मोजत असलेले दोन प्रवासी त्यांना दिसले. त्यांच्यावर हेडगेवार चिकित्सालयातून आलेल्या डॉक्टरांनी वेळेत उपचार केले. पण, त्यांना ते वाचवू शकले नाहीत.
त्या वेळची घटना आठवल्यानंतर श्री. जीतराम जी आज 23 वर्षांनंतरही अगदी हळहळून जातात. तेथील मृतदेह एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे हलवले, त्यांच्यावर अंत्यसंस्कार कसे केले, याविषयी ते सांगतात, स्थानिक शेतकरी चंद्रभान जी यांच्या ट्रॅक्टरच्या मदतीने स्वयंसेवकांनी जळालेले मृतदेह उचलले. मृतदेह सडू नयेत म्हणून रात्री अकरा वाजता तेथील बर्फाचे कारखाने सुरू करण्यात आले. भिवानी, झज्जर आणि रेवाडी अशा ठिकाणांहून बर्फाच्या लाद्या मागवल्या गेल्या. तेथे उपस्थित असलेले पोलिस निरीक्षक धर्माने मुसलमान होते. मृतांमध्ये अनेकजण मुस्लिमधर्मीय असल्याने त्यांच्या मदतीने अंत्यसंस्काराची तयारी केली गेली. भिवानी येथील स्वयंसेवक संतराम जी यांच्या मदतीने ताबूत तयार केले गेले. सकाळी पाच वाजेपर्यंत 159 मृतदेह सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळेपर्यंत श्री. जीतराम जी यांच्या नेतृत्वाखालील स्वयंसेवकांनी 'विमान दुर्घटना पीडित सहायता समिती'ची देखील स्थापना केली होती. यामध्ये विश्व हिंदू परिषद, आर्य समाज, विद्यार्थी परिषद, गुरुद्वारा समितीसह अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. मदतकार्य व्यापक प्रमाणात सुरू केले गेले.
या घटनेचे वृत्तांकन साऱ्या देशभर दुसऱ्या दिवशी झाले. वडवानलासारखे हे वृत्त सगळीकडे पसरले. जिल्ह्यामध्ये मृतांचे नातेवाइक, प्रसारमाध्यमे, पोलिस, प्रशासन पोहोचले. समितीने सर्वांसाठी चहा, पाणी, जेवणाची व्यवस्था केली. ज्या प्रवाशांचे कुणीही नातेवाइक आले नाहीत, त्यांच्यावर स्वयंसेवकांनीच अंत्यसंस्कार केले. यामध्ये स्थानिक मौलवी व दिल्लीहून इस्लामिया प्रतिनिधी मंडळाने मदत केली.
समितीच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवस अहोरात्र काम केले. त्या वेळचे क्षेत्र प्रचारक मा. प्रेम जी गोयल सांगतात, स्वयंसेवकांनी केलेले कार्य पाहून पहिल्यांदाच चरखी दादरीमधील एखाद्या मशिदीमध्ये स्थानिक मुसलमानांनी स्वयंसेवकांचा सत्कार केला. या वेळी तेथील मौलवी महंमद हमीद म्हणाले, ‘संघाचे स्वयंसेवक केवळ माणुसकीचा धर्म पाळतात.’ इतकेच नव्हे, तर दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेले तत्कालीन केंद्रीय नागरिक उड्डाणमंत्री इब्राहिम यांनीदेखील स्वयंसेवकांचे कौतुक केले. कुठल्याही जाती-धर्मापेक्षा हे मानवतेचे पुजारी आहेत, या शब्दांत त्यांनी स्वयंसेवकांचा सन्मान केला.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।