सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

एक महान सेवा यात्री-दामोदर गणेश बापट

भालचंद्र जोशी | छत्तीसगड

parivartan-img

त्यांना स्वतःला कुष्ठरोग नव्हता, किंवा त्यांच्या्  कुठल्याही  नातेवाईकाला कुष्ठरोगाची बाधा झाली नव्हती, तरीही दामोदर गणेश बापट यांनी आयुष्याची चाळीस वर्ष कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी खर्च करून सेवा यज्ञाचा एक महान आदर्श घालून दिला। अगदी जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांनीही ज्या दुर्दैवी कुष्ठरोग्यांना झिडकारले, दूर लोटले, त्यांना बापट यांनी मायेने आपल्या कवेत घेतले, त्यांच्या जखमा धुतल्या, त्यांना औषध पाणी केले, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना जगण्याची नवी उमेद आणि आत्मविश्वास दिला। छत्तीसगडमध्ये चांपा  या जिल्ह्यात सौंठी येथे  125 एकर क्षेत्रावर असलेल्या भारतीय कुष्ठ निवारक संघाची धुरा बापट यांनी अनेक वर्ष निष्ठेने आणि खंबीरपणे सांभाळली। तेथे विविध उपक्रम राबवून त्यांनी कुष्ठारुग्णांना स्वाभिमानाचे आणि सन्मानाचे जीवन उपलब्ध करून दिले। आयुष्यभर कुष्ठरुग्ण सेवेचा हा अखंड यज्ञ करणारया या कर्मयोग्याने मरणानंतरही आपला देह वैद्यकीय संशोधनासाठी अर्पण केला आणि त्यागाचा एक लोकविलक्षण आदर्श प्रस्थापित केला। 2019 साली केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री देऊन गौरव केला पण हा त्या पुरस्काराचाच गौरव होता असे म्हणावेसे वाटते।

बापट यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात पाथरूड याठिकाणी छोट्याशा खेडेगावात 29 एप्रिल 1935 रोजी झाला। लहानपणीच  त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला। त्यांचे वडील गणेश विनायक बापट आणि आई  लक्ष्मी बापट या दोघांनाही संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे विषयी पराकाष्ठेचा भक्तीभाव होता।  गणेश विनायक बापट यांचे लहानपण अतिशय हलाखीच्या खडतर  अवस्थेत गेले, त्यावेळी यांच्या राहण्या-खाण्याची व शिक्षणाची सर्व तरतूद डॉक्टर हेडगेवार यांनी केली होती, सहाजिकच दामोदर गणेश बापट यांच्याही मनात डॉक्टर हेडगेवार यांच्याविषयी  प्रगाढ श्रद्धा आणि नितांत आदर होता। दामोदर बापट यांनी बीकॉम ही पदवी प्राप्त केली आणि काही काळ नोकरी-धंदा करण्याचा प्रयत्न केला पण संघाच्या संस्कारांमुळे व्यक्तिगत सुख समाधानाने त्यांच्या मनाचे समाधान होईना, त्यामुळे ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षीच जशपूर येथे वनवासी कल्याण  आश्रमाच्या शाळेत अध्यापन करू लागले।




कात्रे गुरुजी आणि बापट यांची भेट जणूकाही नियतीनेच ठरवलेली होती। स्वामी रामकृष्ण परमहंस जशी नरेंद्र नाथांची वाट पाहत होते तशीच भारतीय कुष्ठ निवारक संघाची स्थापना करणारे कात्रे गुरुजी, बापटजींची वाट पाहत होते। कात्रे गुरुजी स्वतःला कुष्ठरोगाची लागण झालेली असतानाही आश्रमाची व्यवस्था दहा वर्षापासून संभाळत होते। 1972 साली दामोदर गणेश बापटजी चांपा येथील कुष्ठरोग निवारक संघाच्या कामाची पाहणी करण्यासाठी म्हणून गेले, आणि कायमचे तेथेच रममाण झाले।  हळूहळू कात्रे गुरुजी वयोमानाप्रमाणे आणि  कुष्ठ् रोगामुळे अशक्त होत गेले, आणि कुष्ठ निवारक संघाची जबाबदारी बापटजी यांच्या खांद्यावर येऊन पडली।  बापटजी यांच्यासमोर अनेक अडचणी आ वासून उभ्या होत्या। समाजाने, कुटुंबाने वाळीत टाकलेल्या रुग्णांना नवी हिम्मत, नवी उभारी देणे ही सर्वात कठीण समस्या होती। बापट यांनी अतिशय आत्मीयतेने व भातृभावनेने त्यांची सेवा केली।  कुष्ठरुग्ण आर्थिक दृष्टीने स्वावलंबी व्हावेत, यासाठी त्यांनी भाजीपाला लागवण, खडू बनविणे, दोरी विणणे इत्यादी कामे सुरू केली। आपल्या स्वकष्टाच्या कमाई मुळे कुष्ठ रुग्णांच्या चेहऱ्यावर नवा आनंद, नवे हास्य फुलू लागले।




बापटजीं बरोबर अनेक वर्षापासून आश्रमाची व्यवस्था पाहणारे संघाचे प्रचारक, सुधीर देवजी सांगतात की आश्रमातील परिसरात चार एकर क्षेत्रावर रुग्णांनी अतिशय परिश्रम करून माधव सागर या तलावाची ची निर्मिती केली आहे।  आज हे आश्रमवासी 65 एकर क्षेत्रावर शेती आणि पाच एकर क्षेत्रावर बागायत करीत आहेत, त्यामुळे त्यांची धान्य, भाजीपाला, फळे यांची गरज तर भागतेच, त्याशिवाय आश्रमासाठी दरवर्षी  तेरा लाख रुपयांची मिळकत ही होत आहे।

दामोदर बापट हे कुशल प्रशासक आणि चिंतक होते। कुष्ठ निवारक संघाची  आर्थिक क्षमता वाढत गेली तसेच, त्यांनी क्षयरोग रूग्णांसाठीही वीस खाटांचे संत घासिदास रुग्णालय सुरू केले। या रुग्णालयात वरचेवर मोतीबिंदू शस्त्रक्रियांची मोफत शिबिरे आयोजित करण्यात आली। आजवर येथे दहा हजारांपेक्षा जास्त मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत।  याखेरीज बापट यांनी वनवासी मुलांसाठी  सुशील बालग्रह नावाचे वसतिग्रहही सुरू केले आहे। पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर बापट म्हणाले जेव्हा आश्रमात आलेला कुष्ठरोगी उपचार होऊन पूर्णपणे निरोगी अवस्थेत आपल्या कुटुंबात परत जातो तोच माझ्यासाठी खराखुरा पुरस्कार आणि सन्मान असतो

यावर काय भाष्य करावे, केवळ कृतज्ञ मनाने मूक अभिवादन करणे, एवढेच आपल्या हाती असते।

1234 Views
अगली कहानी