नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
उत्तराखंड
हरिद्वारच्या चंडी घाटावर अनेक भाविक स्नानासाठी येतात; पण क्वचितच कुणाचे लक्ष घाटावर भीक मागणाऱ्या कुष्ठरोग्यांकड़े गेले असेल. जिवंतपणी नरकयातना भोगणारे ते अभागी जीव पाहून क्वचितच कुणाचे हृदय कळवळले असेल. संघाचा एक तरुण प्रचारक आशिष गौतम हे मात्र त्याला अपवाद ठरले. ऑक्टोबर 1996मध्ये आशिष चंडी घाटावर गेले होते. तेव्हा त्यांनी हे कुष्ठरोगी बघितले आणि त्यांची स्थिती पाहून हेलावून गेले. त्यांनी चंडी घाटाजवळच या कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम स्थापन केला.
तेथे आलेल्या कुष्ठरोग्यांमध्ये आठ जण, तर पूर्णपणे अंध होते. त्यांच्यावर आशिष यांनी उपचार करून घेतले. त्यापैकी सात जणांची दृष्टी पुन्हा आली. आशिष यांनी कुष्ठरोग्यांची सेवा, हीच एक ईश्वरी सेवा आहे, असे समजून, आपल्या काही संघ स्वयंसेवकांना मदतीला घेतले आणि ‘दिव्य प्रेम सेवा मिशन’ची स्थापना केली. पाचशे रुपये खर्च करून त्यांनी एक झोपडी खरेदी केली आणि तेथे कुष्ठरोग्यांवर उपचार सुरू केले.
त्यानंतर गेल्या वीस-बावीस वर्षांमध्ये तेथे हजारो कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर कुष्ठरोग्यांच्या निरोगी मुलांसाठी वसतिगृह सुरू केले आहे. या ठिकाणी आज तीनशेहून अधिक मुले राहात असून ते शिक्षण घेत आहेत. या मुलांसाठी ‘माधवराव देवळे शिक्षण संस्था’ स्थापन करण्यात आली आहे. हे सर्व कार्य एकाही पैशाची सरकारी मदत न घेता केवळ समाजाच्या सहकाऱ्यांनी चालू आहे. या शाळेत शिकलेला हिमांशू हा विद्यार्थी मॉरिशस येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. आशिष गौतम यांचा जन्म 22 ऑक्टोबर १९६२ रोजी उत्तर प्रदेशातील हमीरपुर जिल्ह्यात नवोड़ा या छोट्या गावात झाला. अलाहाबाद विद्यापीठातून राजनीतीशास्त्रात एमए आणि त्यानंतर एलएलबी ही पदवी त्यांनी घेतली आणि संघ प्रचारक म्हणून कामाला प्रारंभ केला. 1997पर्यंत प्रचारक म्हणून काम केल्यावर ते अध्यात्मिक साधनेसाठी हिमालयात गेले. याच काळात ते काही स्वयंसेवकांना हरिद्वार येथे सोडण्यासाठी गेले होते. तेथे चंडी घाट येथे एका धर्मशाळेत त्यांनी मुक्काम केला. तेथे कुष्ठरोग्यांची दुर्दशा पाहिली. त्यांना या दुर्दैवी जीवांमध्येच ईश्वराचे दर्शन घेतले आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवाह वेगळ्याच वळणावर गेला. या कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्धार त्यांनी केला. कुष्ठरोग्यांना कुणीच जवळ घेत नसल्याने ते आपली मुले मिशनऱ्यांच्या हाती देत असत. अशा ३५ मुलांना भेटून आशिष गौतम यांनी ‘वंदे मातरम् कुंज’ची स्थापना केली.
त्यानंतर गेल्या २३ वर्षांत तिथे कुष्ठरोग्यांची शेकडो मुले शिक्षित व संस्कारित झाली आहेत आणि यशस्वी जीवन जगत आहेत. ‘दिव्य प्रेम सेवा मिशन’चे संयोजक संजय चतुर्वेदी सांगतात, की या ठिकाणी शिकलेला आणि मोठा झालेला मनोहर नावाचा विद्यार्थी आता त्या शाळेच्या संगणक विभागाचा प्रमुख म्हणून काम करीत आहे. याशिवाय, गौतम यांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी ‘समिधा सेवार्थ चिकित्सालय’ हा दवाखाना सुरू केला आहे. तेथे गरिबांवर मोफत उपचार केले जातात. अतिशय निष्णात डॉक्टर्स या ठिकाणी सेवा करीत असून त्याचा लाभ हजारो कुष्ठरोग्यांनी घेतला आहे. ‘दिव्य प्रेम मिशन’ ही संस्था कुष्ठरोगी महिलांबरोबरच इतर गोरगरीब महिलांना विविध प्रकारचे कौशल्य शिक्षणाचे प्रशिक्षण देते. महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान पुरस्कारासह वेगवेगळे 23 पुरस्कार या संस्थेला मिळाले असले, तरी सेवेलाच परमार्थ मानणारे आशिष सांगतात, ‘‘कुष्ठरोग्यांच्या अपत्यांना समाजाने सर्व प्रकारे स्वीकारले आहे, आपले म्हटले आहे, हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार आहे.’’
संकलन : पारितोष बंगवाल
संपर्क : संजय चतुर्वेदी
9837088910
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।