सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

बांबूच्या आधारानें सावरणारे जग

सौ. माधवी गाडगीळ | गुजराथ

parivartan-img

जसा बुडणाऱ्याला काडीचा आधारही पुरेसा ठरतो, अगदी तसाच आधार मिळाला कच्छमधे (गुजरात) हृदय विदीर्ण करणाऱ्या भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या जन जीवनाला. हा जो आधार मिळाला तो साध्या काडीचा नाहीं तर लवचिक बांबूचा. महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा अतिशय दुर्गम भाग आहे, तेथील बहुतांश वनवासी कुपोषित आहेत, त्या भागांत सुनिल देशपांडे व निरुपमा देशपांडे हे दाम्पत्य वनवासींसाठी "संपूर्ण बांबू केंद्र" चालवतात. या दांपत्याने संघ स्वयंसेवकांच्या सहकार्याने भूकंपग्रस्त कच्छमधे असे कांहीं भरीव काम केले, की तेथेही विपुल प्रमाणांत असणारा बांबू वृक्ष हा ह्या त्रासलेल्या लोकांचा तारणहार बनला.  त्यांना नवसंजीवनी देणारा ठरला.  हा बांबू म्हणजे त्यांच्या साठी जणू कल्पवृक्षच.


आपल्यापैकी कोणीही २६ जानेवारी २००१ रोजी गुजरातमध्ये झालेला भयाकारी  भूकंप विसरलें नसेल.  ह्या भूकंपाने शेकडो गांवे उध्वस्त झाली, हजारो घरे जमीनदोस्त झाली. मागे राहिले ते फक्त दगडा - मातीचे ढिगारे! परंतु अशा परिस्थितीतही लोकं आपल्या घराच्या त्या दगड - मातीच्या ढिगाऱ्यापासून जराही हालत नव्हते, विमनस्क स्थितीत बसून होते. ह्या राड्या - रोडया खाली सोने - नाणे, धन - दौलत, महत्वाचे कागदपत्रक , आणि अनेक मौल्यवान चीजवस्तू, थोडक्यांत त्यांची आयुष्याची कमाई गाडली गेली होती. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर सुद्धां लोकं तसूभरही हलायला तयार नव्हती. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सुनिलजी आपल्या ४५ जणांच्या चमूसह कच्छला पोहोचले.  स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने बांबूची घरे उभी केली ज्याला तेथील भाषेत "भुंगे" म्हणतात आणि ह्या आपद्ग्रस्त कुटुंबांच्या डोक्यावर छत्र - छाया धरण्याचे अभूतपूर्व काम त्यांनी पूर्ण  केले.  बांबूपासून एकूण ७४२ वास्तूंची निर्मिती केली. यामधें फक्त भूकंपरोधी घरेच नाहीं, तर हॉस्पिटल,शाळा ह्यांचीही उभारणी त्यांनी केली. या सर्वांचे लोकार्पण त्यांनी तत्कालीन सरसंघचालक श्री.सुदर्शनजी यांच्या हस्ते केले. 

 

पूर्वी चित्रकूट येथे श्री.नानाजी देशमुख यांच्या समवेत काम केलेले श्री.सुनिल देशपांडे व त्यांच्या पत्नी नेहमी दुर्गम भागांत रहाणाऱ्या वनवासी बांधवांसाठी त्यांच्याच मध्यें  राहून, काम करून त्यांना स्वावलंबी करू इच्छित होते, आणि त्यासाठीं त्यांनी जंगलात सहज परंतु विपुल प्रमाणांत असणाऱ्या बांबूची निवड केली. वनवासी बांधवांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्रातील मेळघाट मधील लवादा येथे "संपूर्ण बांबू केंद्र" स्थापन झाले. आज हे केंद्र वनवासी लोकांच्या उन्नतीसाठी अद्भुत कार्य करत आहे. ह्या पट्ट्यातील ३८ गावांमध्ये २५० हून अधिक "स्वमदत गट" बांबूपासून वस्तू बनवित आहेत. ह्या गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीतून केंद्राने शेकडो कुटुंबांच्या जीवनात आनंद फुलविला आहे. बांबूपासून सुंदर वस्तू बनवणे, घरे उभारणे हे कार्य विस्तारल्यामुळें, वाढल्यामुळें  आत्मनिर्भरतेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. श्री.सुनिलजी सांगतात, "आमचा मुख्य उद्देश ह्या  आदिवासी लोकांमधे सकारात्मकता निर्माण करणे, म्हणजे आम्हीं काहीतरी भरीव करू शकतो ही भावना रुजविणें, आणि त्याद्वारें त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनविणें हा आहे".

 

आता आपण भिल्ल समाजातील गोरेलाल अहिराय यांचेच उदाहरण घेऊ. दुर्देवाने गोरेलाल अष्टवक्रा म्हणजे ज्याची अष्टांगे वेडीवाकडी आहेत अशा व्यधिनी ग्रासलेले होते. गेली १३ वर्षे ते  ह्या केंद्रांत काम करत आहे.  एके काळी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे तर दूरच, पण जो स्वत:च कुटुंबावर भार होता, तोच गोरेलाल आज इतका समर्थ, इतका सक्षम झाला आहे कीं तो स्वतः आता आपल्या वक्र अष्टांगावर कुटुंबाचा भार वाहतो आहे, याच बरोबर तो नागपूरच्या २० अंध मुलांना वेतकामाचे प्रशिक्षण देत आहे. कोरकू या आदिवासी समाजातील पोलिओग्रस्त सोहनलाल जो दिव्यांग ही आ,हे तो आज पांच वर्षांपासून या केंद्रावर काम करत आहे.  विशेष म्हणजे गोरेलाल आणि सोहनलाल हे केंद्रातील प्रमुख शिक्षक आहेत.

 

बांबूच्या घरांशिवाय केंद्रांमध्यें  हस्तकला, शिल्पकला व बांबू संशोधनावर विशेष भर दिला जातो. वनवासी बांधवांनी बनविलेल्या उत्पादनांची प्रसिध्दी आणी  विक्री "वेणू शिल्पी औद्योगिक सहकारी संस्था" ह्या संस्थेतर्फे केली जाते. बांबूपासून सुंदर वस्तू बनविणाऱ्या केंद्रातील कारागिरांना देण्यांत येणाऱ्या प्रशिक्षणाला शैक्षणिक मान्यताही दिली जाते. याशिवाय बांबूच्या नव - नवीन प्रजातींवर चालू असणाऱ्या संशोधनाच्या दृष्टीनेही जोरांत घोडदौड सुरू आहे.  आर्थिक दृष्ट्या परवडणारें आणि कोठेही उभे राहू शकेल अशा "बांबू - बाथरूम" ची निर्मिती करून संस्थेला म्हणजे पर्यायाने वनवासी बांधवांना आत्मनिर्भर तर केलेच आहे,त्याचबरोबर केंद्राने "स्वच्छ भारत अभियान" योजनेला फार मोठे योगदान दिले आहे.

 

संपर्क सूत्र:- सहदेव दादूजी

संपर्क नं. :-9764634511 

795 Views
अगली कहानी