सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

दातार नगर मध्यें शिक्षणाचा झगमगाट

सतीश कुंटे | उत्तराखंड

parivartan-img

आज संपूर्ण गावामध्यें सुगंधित अत्तराचा शिडकावा केला होता आणि गावातील वातवरणामध्यें एक वेगळाच उत्साह संचारला होता. एखादा सण असल्याप्रमाणे घरघरामधें स्वछता करुन सडा संमार्जन केले होते. गावाच्या भूतकाळात थोडे डोकावले असता सद्य परिस्थितीच्या अगदी उलट चित्र असून गावामधील बहुतेक घरांमध्यें देशी दारू बनविली जावयाची आणि त्याकाळी गावामधील वातावरणात एक विचित्र दुर्गंध भरलेला असावयाचा. परंतु आजचा दिवस संपूर्ण गावासाठी एक खूपच महत्वाचा दिवस होता. झांसी नगराचे एस. एस. पी. देवकुमार एंटोनी आज शहरापासून बारा किलोमीटर लांब असलेल्या या दातार गावामध्यें येणार होते. आपली कडक शिस्त व प्रामणिकपणा ह्यासाठी विख्यात असलेले एंटोनी आज दातार गावी दारू विकणाऱ्यांना किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी अथवा तुरुंगात डांबण्यासाठी येणार नव्हते तर गावामधील ज्या युवकांनी दारू पिणे आणि दारू बनविणे ह्या दोन्ही गोष्टी सोडून दिल्या होत्या त्यांचा सत्कार व सन्मान करण्यासाठी एंटोनी साहेब स्वतः आज गावात येणार होते. ही गोष्ट एखाद्या चमत्कारापेक्षा कमी खचितच नव्हती. ज्या कबूतरा समाजामधील लोक आपली गुन्हेगारी वृत्ती व बेकायदेशीर दारुचे धंदे ह्या दोन गोष्टींसाठी कुप्रसिद्ध होते त्याच समाजातील काहीं युवकांचा आज दारुचे व्यसन सोडल्याबद्दल आणि दारू बनविण्याचा धंदा बंद केल्याबद्दल सत्कार होऊ घातला होता.






हे आश्चर्यकारक परिवर्तन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा समर्पण समितीने अनेक वर्षे दातार गावी ह्या कार्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचे फळ होते. समितीतर्फे गेली दहा वर्षे 'एकाच शिक्षकाने चालविलेली शाळा' ह्या उपक्रमाने कबूतरा समाजातील मुलांना शिकविण्याबरोबरच मुलांच्या पालकांनादेखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. दातार गावामधे प्रथम प्रवेशाचा 'मे २००७' मधील तो दिवस राजकुमार द्विवेदी यांच्या आजदेखील चांगलाच स्मरणात  आहे. त्यावेळी कबूतरा समाजामधील कोणीच त्यांना गावामध्ये थारा देण्यास तयार नव्हते. राजकुमारजी गावातील मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत होते पण मुलांचे आई वडील त्यासाठी अजिबात तयार नव्हते. बऱ्याच प्रयत्नांनंतर गावामधील शिक्षण सोडून इतर कुठच्याही गोष्टींमध्ये लक्ष न घालण्याच्या अटीवर गावकऱ्यांनी राजकुमारजींना गावातील मुलांना शिकविण्याची मुभा दिली.






कबूतरा समाजाचा कज्जा (कबूतरा समाजा खेरीज इतर समाज)   समाजावर तील लोकांवर भरंवसा उरला नव्हता. तसेच झांसी व आजूबाजूच्या परिसरातील लोकदेखील कबूतरा समाजातील लोकांना वचकूनच असावयाचे. कबूतरा समाजातील लोकांच्या जवळपासच्या परिसरात शेतीवाडी व घरीदारी चोरीमारीच्या घटना जास्त होतात अशी सर्वसाधारण जनतेची धारणा झाली होती. सर्वसाधारण पणे गरिबी हा शिक्षणामधील एक मोठा अडसर असतो. परंतु दातार गावामध्यें ना कोणी गरीब होते, ना कोणी भुकेले होते, तरीही येथील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यांत आले होते. येथील समस्या वेगळीच होती परंतु गावामध्यें संघाच्या शिक्षणाचा प्रभाव आणि प्रसार जसजसा वाढत गेला तसतसा गावातील मागासलेल्या विचारांचाअंधःकार नाहीसा होऊन गावातील मुलांची पिढी शिक्षणाच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करू लागली.






गेल्या दहा वर्षांमध्यें संपूर्ण दातार गावाचा जणू कायापालटच झाला आहे. बीएससी च्या अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या आशीष मनोरिया ह्याला आता आपल्या नावासोबत कबूतरा हे नाव नकोसे झाले आहे. मनोरिया परिवाराने केवळ दारू पिणे आणि दारू विकणे बंद केलेले नाही तर आता गावामध्यें त्यांचे हार्डवेयरचे दुकान आहे. दुकान चालविणारा अनिल मनोरिया म्हणतो की स्वप्नामध्यें देखील कधी वाटले नव्हते की दारुचा धंदा सोडून आम्ही हार्डवेयरचे दुकान चालवू. 

 

इतिहास बघितला तर कबूतरा समाजातील लोकांनी खूप वाईट दिवस पाहिले आहेत हे चटकन ध्यानात येते. एक काळ तर असा होता की त्यांना पाहताच लोक त्यांना मारायला धावत असत. कोणीही त्यांच्याबरोबर सलोखा राखत नसे. पोट भरण्यासाठी चोरीमारी करणे किंवा दरोडा घालणे इतकेच ह्या लोकांना ठावुक होते. हे सर्व ध्यानांत घेऊन त्यावेळचे गृह राज्यमंत्री बलवंत नागेश दातार ह्यांनी १९५८ साली ह्या लोकांना संघटित करुन त्यांच्यासाठी दातार गावाची स्थापना केली. परंतु चाळीस वर्षांनंतर देखील कबूतरा समाजातील लोक मुख्य प्रवाहांत येऊ शकले नव्हते. सन २००५ मध्ये  संघाच्या महानगर बैठकीमध्ये कबूतरा समाजातील लोकांच्या सामाजिक स्थितीबद्दल प्रथम चर्चा झाली. त्यानंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी कबूतरा समाजातील लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांचा उद्धार करण्याचा चंगच बांधला. एकल विद्यालय ('एकाच शिक्षकाने चालविलेली शाळा') हे ह्या उपक्रमाचे पहिले पाऊल होते. हे विद्यालय आता संघाच्या सेवा समर्पण समितीमार्फत चालविले जाते.





 

आजमितिला दातार गावामधील ४५० मुले झांसीमधील निरनिराळ्या शाळांमध्यें शिकत आहेत. ही मुले एकेकाळी शाळेत जाण्याऐवजी घरी दारूच्या बाटल्या भरत असत आणि आई वडिलांची नजर चुकवून दारू पीतदेखील असत. उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाचे सेवाप्रमुख नवल किशोरजी सांगतात की कबूतरा समाजातील लोक मुलींना काहीही झाले तरी शाळेत घालण्यास तयार नव्हते. ११ ते १४ ह्या वयामधेच ते मुलींचे लग्न लावत असत. परंतु आता ह्या समाजातील ८० मुली झांसीला शाळेमध्ये जातात. इतकेच नव्हे तर कबूतरा समाजातील लोक आता इतर समाजातील लोकांशी देखील मिळून मिसळून वागू लागले आहेत. समितीने जेंव्हा झांसीच्या सीपरी बाजार वस्तीमधील दोन गरीब मुलींचे लग्न लावले तेंव्हा दातार गावातील लोकांनीच लग्न समारंभाचा सगळा खर्च पेलला. सीपरी बाजार येथे देखील समिती बालसंस्कार केंद्र चालविते.

 

गावातील युवकांचा सत्कार समारंभ आटोपल्यावर एस. एस. पी. देवकुमार साहेब म्हणाले की कबूतरा समाजातील लोकांमध्ये झालेले हे परिवर्तन बघून ह्या समाजाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. येथे येण्यापूर्वी कबूतरा समाजामधील लोक गुन्हेगारीचाी वाट कधी सोडू शकतील ह्यावर माझा विश्वासच बसला नसता. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र त्यांचा केवळ दृष्टीकोनच बदलला नाही तर त्यांनी काही युवकांना पोलिस दलात भरती होण्याचे आवाहन देखील केले.

1248 Views
अगली कहानी